नवी दिल्ली
रेल्वेकरीता यंदा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 1.10 लाख कोटींची तरतूद केली आहे. ही विक्रमी तरतूद असल्याचे बोलले जात आहे. वरील तरतूदीपैकी 1.07 लाख कोटी भांडवली खर्चासाठी राखीव ठेवले जाणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. मालवाहतुकीच्या कॉरीडॉरमुळे रेल्वेच्या विकासाला हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या, गरजेच्या वस्तुंचा पुरवठा कोरोनाकाळात रेल्वेने देशभरातील विविध शहरात केला आहे, त्याबद्दल रेल्वे सेवेचे अर्थमंत्र्यांनी भाषणात कौतुक केले. इतर वाहतुकीची वाहने बंद असणाऱया कोरोना काळात रेल्वेने मालवाहु गाडय़ांतून देशाच्या कानाकोपऱयातील शहरात गरजेच्या वस्तुंचा पुरवठा केला आहे. कोरोनाकाळात नाही म्हटलं तरी अत्यंत महत्त्वाची भूमिका रेल्वेने बजावली आहे.
भारतीय रेल्वेने 2030 साठी राष्ट्रीय रेल योजना तयार केली आहे. भविष्यकालीन रेल्वे सेवा सज्ज करण्यासाठी ही जुनी योजना सहाय्य करेल. 2030 पर्यंत उद्योगांकरीता मालवाहतुकीवरचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे. मेक इन इंडियाच्या प्रेरणेतून नजिकच्या काळात अनेक उद्योग उभारले जातील. त्यांच्यासाठी मालवाहतुकीकरीता रेल्वेचे सहाय्य नक्कीच सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला.
जून 2022 पर्यंत पूर्व व पश्चिम भागाचे मालवाहतुक कॉरीडर हे कार्यान्वीत होतील असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. याअंतर्गत सोनेनगर-गोमाहच्या 263 किमीचे काम सार्वजनिक खासगी भागीदारीतून यावर्षी सुरू केले जाणार असून गोमाह-दनकुणी या 274 कि.मी.चे कामही लवकरच हाती घेतले जाणार आहे. खरगपूर- विजयवाडा, भुसावळ ते खरगपूर आणि इटारसी ते विजयवाडा असा कॉरीडॉर निर्माण केला जाणार आहे.
विद्युतीकरणाची महत्त्वाकांक्षी योजना रेल्वेने हाती घेतली आहे. रेल्वे विद्युतीकरणाचा विचार करता 2021 पर्यंत 46 हजार किलोमीटर ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रमाणाचा विचार करता 72 टक्के इतके काम पूर्ण होईल. 1 ऑक्टोबर 2020 ला 41,548 कि.मी.चे विद्युतीकरण झाले होते. डिसेंबर 2023 पर्यंत 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण केले जाणार आहे.
प्रवासी सुरक्षा
रेल्वेने प्रवाशांना आरामदायी प्रवास व्हावा यासाठी तरतूद केली आहे. आरामदायी प्रवास व सुरक्षा यांना प्राधान्य देण्यात आले आहे. एलएचबी कोचेसची नव्याने रेल्वेंना केलेली जोडणी हा आरामदायी प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पहिल्या काही वर्षात केलेल्या या सुविधा फलदायी ठरल्या असून प्रवाशांनीही याबाबत समाधान व्यक्त केले आहे. स्वयंचलीत टक्कर रोखणारी यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.
मेट्रोचा विस्तार
बेंगळूर, चेन्नई मेट्रोचा विस्तार तसेच नागपूर, नाशिक मेट्रोचाही विस्तार केला जाणार आहे. 2020 मध्ये विस्टा डोमा कोचच्या रेल्वेचा वेग 180 किलोमीटर प्रति तास इतका यशस्वीपणे नोंदला गेला आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी अशा रेल्वे आता वाढवण्याचा प्रयत्न होणार आहे.









