ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना विषाणू अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत विक्रमी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे.
वाढत्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत बैठक घेतली. त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. देशातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी सरकार गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करीत आहे. यापुढे ही लसीकरण वेगाने होत राहील असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
1 मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वानाच लस दिली जाणार आहे. याशिवाय लस उत्पादकांनी 50 टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असे देखील सांगण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वी 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्याचे नियोजित करण्यात आले होते. मात्र कोरोनाचा वाढता फैलाव पाहता लसीकरणाचा टप्पा वाढवण्यात आला आहे.