बारावीच्या उर्वरित विषयांचे वेळापत्रक जाहीर, केवळ दिल्लीत दहावी विद्यार्थ्यांची परीक्षा होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणू लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेल्या सीबीएसई दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. 1 ते 15 जुलैदरम्यान उर्वरित विषयांचे पेपर घेण्याचे निश्चित झाले आहे. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे वेळापत्रक जाहीर केले. या संदेशानुसार दहावीची परीक्षा केवळ दिल्लीतील दंगलसदृश भागापुरतीच होणार आहे. तर, बारावीची परीक्षा संपूर्ण देशातील सीबीएसई विद्यार्थ्यांची घेतली जाणार आहे. वेगवेगळय़ा 29 विषयांची परीक्षा होणार असून पुढील वर्गात प्रविष्ट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विषयांनाच प्राधान्य देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात करून निकाल वेळेत लावण्यासाठी मंडळाने प्रयत्न सुरू करावेत, असेही पोखरियाल यांनी सांगितले. परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा अवधी दिला जाईल, अशी घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार आता प्रश्नपत्रिकांचे वेळापत्रक जाहीर झाले असून आता कोरोनाच्या विळख्यातही परीक्षांचे प्रत्यक्ष नियोजन करण्यासाठी सीबीएसई मंडळाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आल्यामुळे परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, कोरोना संसर्गामुळे अन्य वर्गांच्या परीक्षा घेणे अशक्य झाल्याने पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रविष्ट करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.









