मार्गसूची जारी : वर्गखोल्या, शाळांच्या आवारात व्यवस्था : सुरक्षा उपाययोजनांसह होणार अंमलबजावणी
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना संसर्गाचा धोका असल्याने तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित झालेली विद्यागम योजना अधिक सुरक्षा उपाययोजनांसह शिस्तबद्ध पद्धतीने अंमलात आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 1 जानेवारीपासून शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांचे गट करून वर्गखोल्यांची उपलब्धता व पर्यायी व्यवस्था करून त्यांना अभ्यासविषयक मार्गदर्शन करता येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सार्वजनिक शिक्षण खात्याने घेतला असून त्याकरिता मार्गसूची जारी केली आहे. त्याचे प्रत्येक शाळेने पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.
कोरोना परिस्थितीमुळे राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण खात्याने 8 ऑगस्ट रोजी ‘विद्यागम’ योजना सुरू केली होती. घरोघरी किंवा मंदिरे, झाडाखाली मोकळय़ा जागेत विद्यागम योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासपूरक उपक्रमांमध्ये गुंतवले जात होते. मात्र, त्यावेळी मुलांकडून मास्कचा वापर, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर यांचे काटेकोरपणे पालन होत नव्हते. त्यामुळे 10 ऑक्टोबर रोजी विद्यागमला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने 1 जानेवारीपासून पुन्हा विद्यागम योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शाळांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार स्थानिक परिस्थितीनुरुप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळेचा आवार पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबजणार आहे.
सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळेत, शाळेच्या आवारात, परिसरात विद्यागम अंतर्गत शिक्षण देता येणार आहे. मुलांना अर्धा दिवस बोलावून शिक्षण देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मात्र, मास्क, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर राखणे अनिवार्य आहे.
नियमांचे पालन करावे लागणार…
- सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित शाळांनी शाळेच्या आवारातच विद्यागमची अंमलबजावणी करावी.
- सध्या सुरू असणारी ऑनलाईन व इतर पर्यायी शिक्षण व्यवस्था यापुढेही सुरू ठेवावी.
- ऑनलाईन व्यवस्थेद्वारे ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांना दररोज अर्धा दिवस शाळेत बोलावून मार्गदर्शन करणे.
- विद्यागम योजनेंतर्गत शाळेच्या आवारात येणाऱया विद्यार्थ्यांना लेखी स्वरुपात पालकांचे संमतीपत्र सक्तीचे आहे.
- विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी केली जावी. कोविड सुरक्षा मार्गसूचीनुसार स्वच्छतेसाठी व्यवस्था असावी.
- ताप, सर्दी, खोकला किंवा कोरोनाची लक्षणे असणाऱया विद्यार्थ्यांना उपस्थित राहता येणार नाही.
- उपलब्ध शिक्षकांच्या संख्येनुसार विद्यार्थ्यांचे गट तयार करणे. शिक्षकांच्या संख्येइतके विद्यार्थ्यांचे गट करता येतील.
- शाळेत शिक्षकांच्या संख्येइतक्या वर्गखोल्या नसतील तर प्रयोगशाळा, वाचनालय, आवाराचा वापर करता येईल.
- सरकारी शाळेतील विद्यार्थी सध्या इतरत्र वास्तव्यास असेल तर त्याला तेथील सरकारी शाळेत हजर होता येईल.
- विद्यार्थ्यांची संख्या अधिक आणि शिक्षक कमी असतील तर गटपद्धतीत बदल करता येईल.
- ग्रामीण भागात ग्राम पंचायत तर शहरी भागात संबंधित पालिकांच्या मार्फत शाळा परिसराची स्वच्छता, सॅनिटायझेशन करून घ्यावे.
- विद्यार्थ्यांना घरातूनच पिण्याचे पाणी आणण्याची सूचना करावी.
- शाळेत पिण्याचे स्वच्छ पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी.









