चिकोडी पोलिसांची कारवाई : कब्बूरनजीक ट्रक लंपास प्रकरण : दोन ट्रक, दोन कार, एक ट्रक्टर जप्त
वार्ताहर/ चिकोडी
चिकोडी तालुक्यातील कब्बूरनजीक 7 जून रोजी हळद घेऊन जाणाऱया मालवाहू ट्रकला लुटणाऱया 7 दरोडेखोरांना 1 कोटी 3 लाखाच्या मुद्देमालासह चिकोडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दोन ट्रक, दोन कार, ट्रक्टर आणि दुचाकी जप्त करण्यात आली. चिकोडी व्याप्तीतील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली. चिकोडी येथील डीएसपी कार्यालयात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
अथणी तालुक्यातील संबरगी येथील गणेश कल्लाप्पा कोळी, दादासाब शंकर टोण्णे, जनार्दन उर्फ लाला मल्हारी घेंड (रा. पिंपळवाडी, ता. कवठेमहाकाळ), गुरुनाथ नागाप्पा हालमळ्ळी (इटनाळ, ता. रायबाग, शिवानंद सदाशिव पनदी (रा. मुगळखोड), कलिम मुसा मालदार (रा. चिंचली), पांडुरंग रामाप्पा हळ्ळूर उर्फ मालदिनी (रा. घटप्रभा, ता. गोकाक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. केवळ आठ ते नऊ दिवसातच चिकोडी पोलिसांनी या घटनेचा छडा लावून तब्बल 1 कोटी 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पहाटे अडवून ट्रक लंपास
निंबरगी म्हणाले, 7 जून रोजी तामिळनाडू येथील ट्रक चालक एम. चिन्नस्वामी हा आपल्या ट्रकचा क्लिनर पी. भूपतीसह ट्रक (क्र. टीएन 34 व्ही 7404) घेऊन गोकाक तालुक्यातील पामलदिनी येथे हळद भरून रात्री 2.30 च्या सुमारास महाराष्ट्रातील सांगलीकडे निघाला होता. रात्री 3.30 च्या दरम्यान कब्बूरपासून 2 कि. मी. अंतरावर निपाणी-मुधोळ राज्यमहामार्गावर कालव्यानजीक त्यांचा ट्रक आला असता रस्त्यालगत थांबलेल्या कारमधील दोघा इसमांनी त्यांना अडविले. लागलीच लपून बसलेल्या आणखी दोघांनी सदर ट्रक चालक व क्लिनर या दोघांना रॉडने मारहाण करून हातपाय बांधले आणि डोळे बांधून कारमधून त्यांना अथणी तालुक्यातील कोकटनूर तुंगळनजीक सोडले.
20 लाखाचा ट्रक, 13 लाखाची हळद लुटली
20 लाखाचा ट्रक व 13 लाख किंमतीची हळद या दरोडेखोरांनी लंपास केली. त्यानंतर ट्रक चालक व क्लिनर दोघेही शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी 8 जून रोजी दुपारी 12 च्या दरम्यान चिकोडी पोलिसात तक्रार दिली.
या तक्रारीची दखल घेऊन अतिरिक्त जिल्हा पोलीस वरिष्ठाधिकारी अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडीचे डीएसपी मनोजकुमार नाईक, सीपीआय आर. आर. पाटील, पीएसआय राकेश बगली, एल. एम. आरी, एस. सी. मंटूर यांच्या सहभागासह तपास पथकाची नेमणूक करण्यात आली. या पथकात 20 पोलिसांचे सहकार्य घेऊन तपासाची चक्रे वेगवेगळय़ा दिशेने फिरविण्यात आली. यानंतर प्रथम दोन गुन्हेगार सापडले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच इतर पाच जणांनाही अथणी तालुक्यातील विविध ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीनंतर या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे, असे निंबरगी यांनी सांगितले. यावेळी डीएसपी मनोजकुमार नाईक, सीपीआय आर. आर. पाटील, पीएसआय राकेश बगली, एस. सी. मंटूर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.









