कोल्हापूर :
कॉस्मेटीक व्यापाऱ्याच्या ऑफीसमधून भरदिवसा 9 लाख 80 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवार (29 मार्च) रोजी घडली. अज्ञात चोरट्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दोर टाकून प्रवेश करुन चोरी केली. याबाबतची फिर्याद राजु राम केसरी (वय 42 रा. कारंडे मळा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने एकास ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजु केसरी यांचा कॉस्मेटीकचा व्यवसाय आहे. त्यांचे ऑफीस रुक्मीणीनगर येथील गुरुनानक सोसायटीमधील मानसी इस्टेट या अपार्टमेंटमध्ये आहे. अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या ऑफीसमध्ये त्यांचे काही कर्मचारीही राहतात. शुक्रवार (28 मार्च) रोजी ते कुटूंबासह शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी गेले होते. दोन दिवस गावी जाणार असल्यामुळे राजु केसरी यांनी कामगारांकडे 10 लाख रुपयांची रोकड व्यवसायासाठी ठेवली होती. शनिवारी दुपारी अज्ञात चोरट्याने कार्यालयात कोणीही नसल्याचे पाहून फ्लॅटमध्ये प्रवेश करुन ही रोकड लंपास केली. कर्मचारी फ्लॅटमध्ये परत आल्यानंतर त्यांना तिजोरीमधील साहित्य विस्कटल्याचे दिसून आले तसेच तिजोरीतील रोकडही गायब झाल्याचे निदर्शनास आली. त्यांनी याबाबतची माहिती मालक राजु केसरी यांना दिली. केसरी त्याच दिवशी रात्री कोल्हापूरात दाखल झाले. त्यांनी याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक कारंडे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.
- दोरीवरुन उतरुन पळाला चोरटा
चोरट्याने भरदिवसा चोरी करण्याचे धाडस दाखवत रोकड लंपास केली. चोरट्याने मुख्य दरवाजातून प्रवेश केला. मात्र चोरी करुन जाताना मुख्य दरवाजाला आतील बाजूने कडी लावण्यात आली होती. दुसऱ्या मजल्यावरुन उतरण्यासाठी चोरट्याने दोरखंडाचा वापर केला होता. अंदाजे 20 फुटाचे अंतर दोरखंडावरुन उतरुन चोरट्याने घटनास्थळावरुन पलायन केले.
- एक संशयित ताब्यात
दरम्यान या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पाच महिन्यापूर्वी केसरी यांच्या कार्यालयातच काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे चौकशी सुरु आहे.








