सातारा :
मराठ्यांची राजधानी तथा छत्रपती शाहू महाराजांनी साम्राजाचा विस्तार केला तो किल्ले अजिंक्यतारा. त्याच्या संवर्धनासाठी पर्यटन विकासमधून 5 कोटी मंजूर केले आहेत. शेंद्रे आणि लिंबखिंडीतूनही रात्रीचा किल्ले अजिंक्यतारावरील भगवा फडकता ध्वज दिसला पाहिजे, असे काम करण्यात येणार आहे. त्याचा प्रस्तावही तयार केला आहे. कोयनानगर येथील नेहरु उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी सुमारे 40 कोटींचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, पर्यटनस्थळे असलेल्या शहरामध्ये महाबळेश्वर, पाचगणी येथील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. साताऱ्यात त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री देसाई म्हणाले, कोयनानगर येथील नेहरु उद्यान आहे. ते म्हणावे तेवढे सुस्थितीत नाही. त्याच्या संवर्धनाकरीता जलसंपदामंत्री विखे-पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. त्याच्या सुशोभिकरणाचे अंतिम सादरीकरण बैठकीत पाहिले, त्याला मान्यता घेतली आहे. नेहरु उद्यानाची जागा जलसंपदा विभागाची आहे. विकासासाठी त्यांनी तोंडी मान्यता दिली. मालकी जलसंपदा विभागाचीच राहील. डेव्हलप आणि मेंटेन्सस करणे ही जबाबदारी पर्यटन विभागाला देणार आहेत. तत्पूर्वी 9 एकर जागा अद्ययावत गार्डनचा प्रस्ताव सादरीकरण सुद्धा पाहिले होते. त्यात काही बाबी दुरुस्ती करुन सोमवारी पुन्हा त्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर हायपॉवर कमिटीकडे तो प्रस्ताव जाईल. त्या प्रस्तावावर पुरवणी मागण्याच्या अगोदर चर्चा करुन मान्यता देऊ. त्याचबरोबर पहिली जी तरतूद आहे. त्यावर अद्ययावत गार्डन करण्यासाठी प्रयत्न असून त्यामध्ये स्कॉयवॉकसह इतर बाबी नमूद आहेत. त्याकरीता सुमारे 40 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
- अजिंक्यतारा किल्ल्याच्या संवर्धनासाठी 5 कोटी
पालकमंत्री म्हणाले, जिह्यात गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काही योजना केल्या आहेत. गतवर्षी प्रतापगड रिस्टोरेशनचे काम केले. आता राहिलेली तळी संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे. तळ्यातील पाण्याचा उद्भव बळकटीकरणाचे प्रयत्न होत आहेत. तसेच छत्रपती शाहू महाराजांची राजधानी अजिंक्यतारा किल्ला असून तिथल्या कामासाठी निधी दिला होता. आजच्या बैठकीत निधी उपलब्ध करुन दिला आहे. लिंब खिंडीतून येताना आणि शेंद्रे येथून सुद्धा अजिंक्यतारा दिसला पाहिजे. सोलर लाईटवर अजिंक्यताऱ्यावरील भगवा झेंडा रात्रीचा सुद्धा फडकताना दिसला पाहिजे. त्या कामास तत्वत: मान्यता दिली आहे. तसेच 5 कोटी निधी मंजूर केला असून लवकरच कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, कास परिसरातील रस्त्याची कामे सुरु आहेत. सातारा ते बामणोली रस्त्याची वर्कऑर्डर झाली आहे. तसेच वाई ते महाबळेश्वर, महाबळेश्वर ते मेढा याही रस्त्याची कामे करण्यात आली आहेत. महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या सूचना तेथील मुख्याधिकाऱ्यांना देऊन प्रस्ताव मागवून घेतले आहेत. जिल्हा नियोजनमधून तेथील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे, आपला पर्यटनस्थळाचे रस्ते करण्यावर भर राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
- उबाठाचा खरपूस समाचार
राजकीय प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, उबाठाच काय, कोणत्याही पक्षाने कुठले आंदोलन करावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. उबाठाचे नेते संजय राऊत हे सकाळी नऊच्या भोंग्याला टीव्हीवर येतात. त्यांनी मागे सिंदूर ऑपरेशन मोहिमेत सहभागी झालेल्या सैनिकांचा अवमान केला होता. आता उसने अवसान आणून काहीतरी करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांचा सुरु आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतून क्रॉस व्होटिंग झाल्याने देशभरातून संशयाची सुई ‘उबाठा’कडे दाखवली जात आहे. त्यामुळे त्याचा मागोवा घेण्यासाठी अशा बैठका घेतल्या जात असाव्यात, असे उत्तर त्यांनी दिले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीच्या प्रश्नावरही ते म्हणाले, मनसे आणि उबाठाचे दोन्ही नेते पूर्ण निर्णय घेणारे नेते आहेत. त्यांचा ते निर्णय घेतील. त्यांचा त्यांना निर्णय घेऊ द्या. नंतर आम्ही बोलू, अशीही चपराक त्यांनी लगावली.
- मराठा आरक्षणाचा जीआर अभ्यासपूर्णच
मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ हे कोर्टात जाणार आहेत, असा प्रश्न केल्यावर मंत्री देसाई म्हणाले, कोर्टात जाण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण मराठा आरक्षणाचा जीआर काढत असताना सर्व तपासण्या करुन कायद्याचा अभ्यास करुन काढलेला आहे. एकेक शब्द कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे. सगळ्या दिग्गज कायदेतज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच जीआर काढला आहे, असेही त्यांनी सांगितले.








