सांगली :
सांगली ते मिरज रेल्वेस्थानक दरम्यान एसटी बसमधून निघालेल्या एका प्रवाशाची सांगली बसस्थानकातून लेडीज पर्समध्ये ठेवलेली पावणेपाच लाखांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली.
याप्रकरणी धनापांडे उचीकाले देवर (वय-४०, रा. बिटा, ता. खानापूर, जि. सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, धनापांडे उचीकाले देवर हे मूळचे तमिळनाडू राज्यातील मदुराई जिल्ह्यातील उसलमपट्टी गावचे रहिवासी आहेत. मात्र बॉबी विक्रीच्या व्यवसायामुळे ते विट्यातील सूर्यनगर येथे कुटुंबासमवेत वास्तव्यास असतात. त्यांच्या सासूने बँकेत गहाणवट ठेवलेले त्यांचे दागिने सोडविण्यासाठी पत्नी सौ. आनंदी, मुलगी रितीकासह ते दि. १७ मार्च २०२५ रोजी आपल्या मूळगावी उसलमपट्टीकडे दागिने सोडविण्यासाठी ४ लाख ७० हजार रूपयांची रोख रक्कम घेऊन निघाले होते.
त्यावेळी पत्नी सौ. आनंदी हिच्या चॉकलेटी रंगाच्या लेडीज पर्समध्ये रोख रक्कम व कागदपत्रे, मोबाईल चार्जर ठेवला होता. ही लेडीज पर्स आकाशी निळ्या रंगाच्या प्रवासी बॅगेत ठेवली होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सांगली एसटी स्टॅण्ड ते मिरज रेल्वेस्थानक या दरम्यान गर्दीचा फायदा घेवुन प्रवासी बॅगेमधील ४ लाख ७० हजारांची रोख रक्कम आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, एटीएमकार्ड अशी कागदपत्रे ठेवलेली पत्नी सौ. आनंदी हिची चॉकलेटी रंगाची लेडीज पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तपास सचिन घाटगे करीत आहेत.








