कोल्हापूर :
शहर वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पथकांनी कारवाईचा बडगा उगारत रात्री अपरात्री ट्रिपलसिट फिरणे, मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्माक कारवाई केली. एकूण 258 वाहनधारकांवर कारवाई करत एक लाख 88 हजार रूपयांचा दंड वसुल केला. शनिवारी व रविवारी रात्री शहरातील प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करुन हुल्लडबाजी करणाऱ्या वाहनधारकांवर धडक कारवाई करण्यात आली.
शहरात रात्री उशिरा मद्यप्राशन करुन वाढदिवसाच्या निमित्ताने हुल्लडबाजी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील प्रमुख चौकात असे प्रकार घडत आहेत. त्याचबरोबर किरकोळ अपघातांच्या घटनाही घडत आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री शहर वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांनी धडक कारवाई केली.
शहरातील दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, बिंदू चौक, उमा टॉकीज, तोरस्कर चौक, सिपीआर चौक, ताराराणी पुतळा, क्रशर चौक, बावडा परिसर या परिसरात नाकाबंदी करुन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 258 वाहन धारकांवर कारवाई करुनं एक लाख 88 हजार रुपयांचा दंड वसुल केला होता.
- अशी झाली कारवाई :
-ड्रंक अँड ड्राईव्ह : 12
-ट्रीपल सीट : 52
-वाहन चालविताना मोबाईलचा वापर : 15
-इतर कारवाई : 110
-एकूण कारवाई : 258
-एकूण दंड वसूल : 1 लाख 88 हजार रूपये








