महाबळेश्वर :
पाचगणीसह कुंभरोशीपर्यंत नेहमी विज वितरणाची होणारी अडचण दूर होण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. तालुक्यातील भूमिगत विज वाहिनीसाठी १७ कोटी ६० लाख मंजूर झाले असून लवकरच काम सुरू होऊन महाबळेश्वर, पाचगणीकरांना विजेच्या लपंडावापासून सुटका मिळणार आहे.
गेली अनेक वर्षे वाईपासून वाडा कुंभरोशीपर्यंत अनेकवेळा खराब हवामानात, पावसाळ्यात नेहमीच महाबळेश्वरकरांना विजेच्या समस्येमुळे अंधारात राहण्याची वेळ येत होती. याबाबत उपाययोजना करण्यासाठी सातत्याने नागरिकांसाठी येथील प्रसारमाध्यमांनी वर्तमानपत्रातून तसेच मंत्री पाटील यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती. मंत्री पाटील हे देखील भूमिगत विज वाहिनीसाठी सातत्याने प्रयत्न करत होते.
त्यांच्या प्रयत्नांमुळे महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर पाचगणीसह वाडा कुंभरोशीपर्यंत विजेच्या लपंडावाची समस्या दूर होण्याचे सर्व अडथळे दूर झाले असून लवकरच या कामाचा शुभारंभ होईल.
महाबळेश्वर तालुका हा दुर्गम असून या भागात पावसाळ्यात जर वीज गेली तर ती आठ आठ दिवस येत नाही. वीजवितरण कंपनी तुटपुंज्या कर्मचारी वर्गाअभावी हतबल होते. त्यामुळे याचा तोटा नागरिकांसह या पर्यटनस्थळाच्या व्यवसायावर देखील मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्यामुळे याचे गांभीर्य ओळखून राजेंद्र राजपुरे व संजय गायकवाड यांनी देखील मंत्री पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याला आता यश आले.
महाबळेश्वर प्रमाणेच पाचगणीमध्ये सुद्धा हिच परिस्थिती असल्याने सोसाट्याच्या द्मयात व मुसळधार पावसात विजेच्या तारांवर वृक्ष कोसळतात त्यावेळी वीज जाते. हे काम करताना वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे आता ही समस्या दूर होणार असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील जनतेने मंत्री मकरंद आबा पाटील यांचे आभार मानले आहेत.








