आटपाडी :
शेअर मार्केटमधून जादा परतावा देण्याचे अमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडून तब्बल 16 लाखाला गंडा घालण्याचा प्रकार उजेडात आला आहे. आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील पतंगराव गोविंद कदम यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील दोघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील पतंगराव गोविंद कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मल्लेश धुंडाप्पा माळी व माधुरी मल्लेश माळी (दोघे रा. झाडगल्ली गडहिंग्लज ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापुर जिल्ह्यासह गडहिंग्लज परिसरातून यापुर्वी मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटच्या नावाने झालेल्या फसवणुकीच्या घटना उजेडात आल्या आहेत. आत्ताही गडहिंग्लज येथील दोघांनी केलेली फसवणूक चर्चेत आली आहेत.
ऑगस्ट 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत फसवणूक झाली आहे. मल्लेश धुंडाप्पा माळी व माधुरी मल्लेश माळी या दोघांनी त्यांच्या नावे असलेल्या हिरा एम.डी.एम ट्रेड बोअर्स एलएलपी कंपनीमध्ये पतंगराव कदम यांना 23 लाख गुंतवण्यास लावले. त्यातील 15 लाख 97 हजार 843 रूपये रक्कम परत न देता कदम यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजीव केंद्रे करत आहेत.








