मिरज :
मिरज जंक्शनलगत कोल्हापूर चाळ येथे 1.73 कि.मी. लांबीच्या कॉर्ड लाईन प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पासाठी 128 कोटी 73 लाखांच्या निधीला मंजुरी दिली असून, अल्पावधीतच मिरज जंक्शनलगत नवीन कॉर्ड लाईन साकार होईल.
दरम्यान, या कॉर्ड लाईन प्रकल्पाला सुरूवातीस स्थानिकांचा विरोध झाला होता. कॉर्ड लाईनमुळे जंक्शनवर महत्त्वाच्या रेल्वे गाड्या येणार नाहीत, असा आरोप झाला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने आरोपांचे खंडन केले असून, नवीन कॉर्ड लाईनमुळे विविध लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे इंजिन बदलण्याच्या प्रक्रियेत किमान दोन तासांचा वेळ कमी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दररोज 25 ते 30 रेल्वे गाड्यांची ये-जा आणि सुमारे 40 ते 45 हजार प्रवाशांची चढउतार अशा अत्यंत व्यस्त मानल्या जाणाऱ्या मिरज जंक्शनचे मध्य रेल्वे विभागात विशेष महत्त्व आहे. मिरज-पुणे, मिरज-हुबळी, मिरज-सोलापूर आणि मिरज-कोल्हापूर अशा दक्षिण-पश्चिम रेल्वे मार्गाला जोडणाऱ्या मिरज जंक्शनवर सध्या अस्तित्वात असलेले प्लॅटफार्म कमी पडत आहेत. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना इंजिनची दिशा बदलण्यासाठी सुमारे दीड किलोमीटर इंजिन फिरवून आणावे लागते. यामध्ये रेल्वेचा वेळ वाया जावून सुमारे तास ते दीड तासांसाठी एकाच प्लॅटफार्मवर रेल्वे गाड्या थांबवून ठेवाव्या लागतात. परिणामी पॅसेंजर गाड्या आणि माल गाड्यांना एक नंबरच्या फलाटावर आणावे लागते.
मल्टी ट्रॅकिंग, फ्लायओव्हर, बायपास लाईन क्षमता वाढीअंतर्गत मिरज जंक्शनवरील रेल्वे परिचालन सुलभ करण्यासाठी मध्य रेल्वेने मिरज-कोल्हापूर मार्गावर कॉर्ड लाईन प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मांडला. सुरूवातीला या प्रस्तावाला स्थानिकांचा विरोध झाला. कॉर्ड लाईन झाले तर कर्नाटक, सोलापूरातून येणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे गाड्या मिरज जंक्शनपर्यंत न येता कॉर्ड लाईनवऊन निघून जातील. यामुळे मिरज जंक्शनचे महत्त्व कमी होईल, असा आरोप केला जात होता.
यासाठी विविध रेल्वे संघटनांनी रेल्वे महाव्यवस्थापकांना पत्र देऊन विरोधही दर्शविला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने रेल्वे सल्लागार समितीच्या वार्षिक बैठकीत आपली बाजू मांडून मिरज जंक्शनलगत कॉर्ड लाईनचे काय महत्त्व आहे, हे पटवून सांगितले. त्यानंतर संबंधीत प्रकल्पाच्या जागेचा सर्व्हे कऊन अंतिम प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला होता. मिरज-कोल्हापूर मार्गावरील कोल्हापूर रेल्वे चाळजवळ मिरज-पुणे, मिरज-कोल्हापूर, मिरज-पंढरपूर आणि मिरज-लोंढा या मार्गांना जोडणारा एक प्रमुख इंटरचेंज पॉइं&ट आहे. त्यामुळे तेथेच 1.73 कि.मी. लांबीचा मिरज रेल्वे कॉर्ड लाईन प्रकल्प उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पासाठी 128 कोटी, 78 लाख ऊपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रकल्पामुळे माल वाहतूक आणि प्रवासी गाड्यांचा कार्यक्षमतेने संचालनाचा मार्ग सुकर होईल, तसेच मिरज ते कोल्हापूर प्रवासाचा वेळही कमी होईल, असा दावा मध्य रेल्वे विभागाने केला आहे.
- दोन तासांचा वेळ वाचेल
सध्या कुर्डुवाडी किंवा हुबळी येथून येणाऱ्या आणि कोल्हापूर येथे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मिरज जंक्शवर थांबावे लागते. निर्धारीत प्रवासावेळी रेल्वेची दिशा बदलण्यासाठी इंजिन किंवा ब्रेकव्हॅन रिव्हर्स करताना किमान दोन तास लागतात. त्यामुळे कारण नसताना या रेल्वे गाड्या एकाच फलाटावर दोन तास अडकून पडतात. प्रस्तावित कॉर्ड लाईनमुळे परिचालन विलंब दूर होईल. कॉर्ड लाईनमुळे इंजिनची दिशा बदलण्यासाठी लागणारा दोन तासांचा वेळ कमी होईल, असे मध्य रेल्वे विभागाने सांगितले आहे.








