ऑनलाईन टीम / पॅरिस :
ॲस्ट्राझेनेकाच्या लसीमुळे रक्तात गुठळ्या होण्याचा कोणताही धोका नाही. ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे युरोपियन युनियनच्या औषध नियामक मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर जर्मनी, फ्रान्स, इटली आणि स्पेनने ॲस्ट्राझेनेका कोरोना लसीच्या पुनर्वापराला मंजुरी दिली.
ॲस्ट्राझेनेकाची कोरोना लस घेतल्यानंतर धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर युरोपातील डझनभर देशांनी या लसीचे लसीकरण तात्पुरत्या काळासाठी थांबविले होते. युरोपियन युनियन आणि युकेत 17 दशलक्ष लोकांना ही लस देण्यात आली आहे. त्यापैकी केवळ 40 लोकांमध्ये रक्ताच्या गाठी होणाचा प्रकार दिसून आला. मात्र, लसीमुळे रक्तात गाठी होत असल्याचा कोणताही पुरावा नव्हता.
तरीही हे देश युरोपियन युनियनच्या औषध नियामक मंडळाकडून लसीच्या पुनर्वापरासाठी मंजुरी मिळण्याची वाट पाहत होते. अखेर ही लस कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे तेथील औषध नियामक मंडळाने स्पष्ट केले. त्यामुळे लसीच्या पुनर्वापराचा मार्ग मोकळा झाला.









