ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्य प्रदेशातील इंदूर, सागर आणि जबलपूरच्या रुग्णालयात ब्लॅक फंगसच्या रुग्णांना ‘ॲम्फोटेरिसिन-बी’ इंजेक्शन दिल्यानंतर 70 हून अधिक रुग्णांची प्रकृती बिघडली. या रुग्णांना ताप, उलट्या, चक्कर येणे आणि थंडीमुळे हातपाय थरथरणे अशी लक्षणे दिसल्यानंतर प्रशासनाने ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनच्या वापरावर बंदी घातली. तसेच उर्वरित इंजेक्शन परत केली.
जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये वॉर्ड क्रमांक 5 आणि 20 मध्ये ब्लॅक फंगसने ग्रस्त रुग्णांना ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन देण्यात आले होते. त्यानंतर 10 मिनिटातच 60 रुग्णांना ताप, उलट्या आणि थंडीमुळे हातपाय थरथरणे यासारखी लक्षणे दिसून आली. इंदूर आणि सागर जिल्ह्यातील रुग्णालयांमध्येही असाच प्रकार आढळून आला. त्यानंतर डॉक्टरांनी सतर्कता बाळगून 20 नर्सेसला बोलावून रुग्णांना अँटी रिएक्शन इंजेक्शन दिली. त्यानंतर आता रुग्णांची प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, या प्रकारावरून काँग्रेसने शिवराज सरकारवर हल्ला चढवला असून, घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.