सातारा / प्रतिनिधी :
गेल्या सतरा महिन्यांपासून आरोग्य विभाग सातत्याने गाजत आहे. त्यामुळे सातारा पालिकेच्या सभेत आरोग्य विभागावर आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर सोमवारपर्यंत आरोग्य विभागाला कारभारी देऊ, अशी ग्वाही ॲड. दत्तात्रय बनकर यांनी सभागृहात दिली आहे. त्यामुळे सभागृहामध्ये दिलेल्या शब्दानुसार बनकर आरोग्य विभागाच्या अभियंत्यांची माळ कोणाच्या गळ्यात घालणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सक्षम आणि पट्टीतील अधिकारी म्हणून फक्त अभियंता दिलीप चिद्रे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु आहे.
पालिकेतील आरोग्य विभाग हा तर महत्वाचा विभाग असून, या विभागामध्ये नेत्यांनी मोठया विश्वासाने पुन्हा ज्यांच्याकडे पद होते त्यांच्याकडेच पदभार सोपवला. कारभारी चांगला असता तर अशा उचापती झाल्या नसत्या. त्या उचापती थांबवता आल्या असत्या परंतु आपल्याच नातेवाईकांना खातेप्रमुखपद देऊन आणून आगीत तेल ओतून भडका करण्याचे काम झाले. त्यामुळे काम सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडत गेले. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी अनेकदा बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोग्य विभागाचा बिघडलेला कारभार हा काही सुधारण्याचे नाव घेईना. त्यामुळे नुकत्याच झालेल्या सभेत आरोग्य विभागाला फैलावर घेण्यात आले. दरम्यान, आरोग्य विभागाचे असलेले प्रमुख शैलेश आष्टेकर यांनी बदली मागवून घेतली. तर आता बनकर यांची कोणत्या अधिकाऱ्यावर मर्जी होणार? याकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे.









