हज कमिटी ऑफ इंडियाचा निर्णयः महाराष्ट्रातील यात्रेकरूंची मुंबईत होणार स्वॅब तपासणी
संग्राम काटकर / कोल्हापूर
सौदी अरेबिया सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे भारत सरकारच्या हज कमिटी ऑफ इंडियाने हजयात्रेला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी काही सक्त पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 18 वर्षा आतील आणि 65 वर्षावरील मुस्लिम बांधवांना हजयात्रेसाठी `नो-एंट्री’ केली आहे. हजयात्रेसाठी होणाऱ्या गर्दीमुळे लहान मुले आणि वयस्करांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही नो-एंट्री आहे.
दरवर्षी देशभरातून लहान मुलांपासून ते 75 वर्षापर्यंत दीड लाखांहून अधिक मुस्लिम बांधव हजयात्रेसाठी जातात. यंदा मात्र कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला असून हज क्षेत्रही याला अपवाद नाही. यंदाच्या वर्षी सौदी अरेबिया सरकारने हजयात्राच रद्द केली. मात्र जानेवारी 2021 पासून हजयात्रेला सरकारकडून परवानगी मिळेल, असे संकेत देण्यात आले आहेत. तसेच जगभरातील देशांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक तत्वेही दिली आहे. या तत्वांनुसार भारत सरकारच्या हज कमिटी ऑफ इंडियानेही काही मार्गदर्शत्व तत्वे तयार करून ती गेल्या महिन्यात जाहीर केली आहे. यानुसार 18 वर्षावरील आणि 65 वर्षाखालील मुस्लिम बांधवांनाच हजयात्रेला जाता येणार आहे. तसेच जे वयाच्या मर्यादेत बसतात, पण हृदयविकार, बौधिक अक्षम (मतिमंद), डोळ्यांचा विकार, क्षयरोग, दमा या अन्य आजार आहेत, त्यांना परवानगी मिळणार नाही. रक्तदाब आणि मधुमेहींना मात्र यात्रेला जाण्यास परवानगी असणार आहे.
स्वॅब तपासणी आवश्यकच
महाराष्ट्रातून हजयात्रेला जाणाऱ्यांना 72 तास आधी मुंबई विमानतळावर स्वॅब तपासणी केली जाणार आहे. ज्यांचा स्वॅब कोरोना निगेटिव्ह येईल, त्यांना हजयात्रेसाठी सौदी अरेबियाकडे सोडले जाणार आहे. सौदीतील जद्दा विमानतळावरही यात्रेकरूंची स्वॅब तपासणी करून त्यांना काही दिवस क्वॉरंटाईन केले जाणार आहे. क्वॉरंटाईन कालावधी अहवाल निगेटीव्ह आलेल्यांना हजयात्रेसाठी सोडले जाणार आहे. यात्रा पूर्ण करून मुंबई विमानतळावर आल्यानंतर यात्रेकरूंची पुन्हा स्वॅब तपासणी केली जाईल. तसेच त्यांना 3 ते 7 दिवस क्वॉरंटाईनही केले जाईल. या कालावधी ज्यांचा अहवाल निगेटीव्ह असेल, त्यांना आपल्या गावी सोडले जाणार आहे. ज्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असेल त्यांना मात्र उपचारासाठी मुंबईत थांबावे लागणार आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय
हजयात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या जिह्यातील मुस्लिम बांधवांसाठी हज फाऊंडेशनने दसरा चौकातील मुस्लिम बोर्डींगमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय केली आहे. 10 डिसेंबरपर्यंत इच्छूकांना अर्ज करता येईल. येताना सोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, बँक पासबूक, रक्तगट आदी कागदपत्रांच्या झेरॉक्ससह व पांढरी बॅकग्राऊंड असलेला रंगीत फोटो आणावा, असे आवाहन हज फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष इम्तियाज बारगीर यांनी केले आहे.









