तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सराफ व्यावसायिकास दामदुप्पट फायद्याचे आमिष दाखवून 19 कोटी सात लाख 78 हजारांची फसवणूक करणाऱया अमोल सुरेश यादव (रा. युनिटी आयकॉन, जुळे सोलापूर) या बिल्डरचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी फेटाळला. याबाबत प्रशांत आत्माराम गुरव (वय 46, रा. रामराज्य संकुल, नाशिक) यांनी फिर्याद दिली. विजापूर नाका पोल्नीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
दागिने खरेदी करण्यातून आरोपी आणि फिर्यादीची ओळख झाली. त्यानंतर वारंवार आरोपी फिर्यादीच्या दुकानात खरेदीसाठी जात होता. यातून आरोपीने जाणीवपूर्वक फिर्यादीबरोबर मैत्रीचे नाते निर्माण केले. व्यवहारातून निर्माण झालेली मैत्रीचे कौटुंबिक नात्यात रुपांतर झाले. दरम्यान, आरोपीने फिर्यादीला बांधकाम व्यवसायात पैसे गुंतविण्याचा सल्ला दिला. तसेच दामदुप्पट फायदा होईल, बांधकाम व्यवसायाचे शिक्षण घेत असलेल्या मुलाला भविष्यात फायदा होईल, असे अमिष दाखविले.
फिर्यादीने वडिलोपार्जित जमिनीची विक्री करुन सुरुवातीला 4 कोटी 26 लाख दिले. त्यानंतर आरोपी व्यवसायासाठी म्हणून सोलापुरात आला. तेव्हा फिर्यादीने पैशाची मागणी केली, मात्र आरोपीने जागा घेतली आहे, तसेच कार्यालय थाटले असून व्यवसाय मोठ्या प्रमाणात होऊन फायदा होईल, असे सांगून पुन्हा पैसे घेतले. दरम्यान, फिर्यादीचा मुलगाही शिक्षण पूर्ण करुन सोलापुरात आला. यानंतर अकरा कोटी आणि नंतरही वेळोवेळी आरोपीच्या मागणीनुसार पैसे दिले. त्यासाठी मित्रांकडून हातऊसनेही घेतले. सन 2013 ते 2021 पर्यंत आरोपीने 19 कोटी सात लाख 78 हजार 570 रुपये फिर्यादीकडून घेतले. दोघांत भागीदारी असतानाही त्याने फिर्यादीच्या परस्पर घराची विक्री करुन पैसे लाटून फसवणूक केली.
या गुन्ह्यात अटक होईल या भीतीने आरोपीने अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज केला होता. सरकारपक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने तो फेटाळला. या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी तर आरोपीतर्फे ऍड. प्रवीण शेंडे यांनी काम पाहिले.









