डॉ. स्नेहल अवधूत सुखठणकर
मा झ्या लहानपणी माझ्या आजीकडून एक घटना ऐकली होती, तो काळ असा होता जेव्हा स्त्रियांच्या पुनर्विवाहाला समाजमान्यता नव्हती. उच्च वर्णांपैकी एका समाजातील मुलगा जलोदराने पीडित होता, जलोदरावर तर आताच्या वैद्यकीय शास्त्रातही प्रश्नार्थक उपचार आहेत. मग त्या काळी काय स्थिती असणार ? डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं की जास्तीतजास्त 6 महिने हा मुलगा जगू शकेल, पण त्या काळच्या समजुतीप्रमाणे ब्रह्मचारी मेला तर अग्नि देता येणार नाही, केवळ या विचाराने त्या मुलाचे लग्न केले तेही त्याच्या आजाराबद्दल मुलीकडच्या घरच्या लोकांपासून लपवून. 6 महिन्यातच तो मुलगा स्वर्गवासी झाला पण ती मुलगी मात्र आयुष्यभर दु:खात जगली, तारुण्य वाया गेले, त्या काळाप्रमाणे केशवपन, तांबडय़ा रंगाचं लुगडं. जिवंतपणी नरकयातना भोगल्या त्या मुलीनं !
अगदी अलीकडची आणखीन एक सत्य घटना आठवली. पूजा आणि प्रवीणचं लग्न ठरलं , दोन्ही घरातील कुटुंबियांना खूपच आनंद झाला, पण पूजाने आपल्या आईवडिलांकडून लग्नाला होकार देण्याआधी थोडा वेळ मागितला होता, पण प्रवीण व्यवसायाने डॉक्टर त्यात लवकरच त्याचं वैद्यकीय क्षेत्रातील पोस्ट ग्रॅज्युएशन संपणार होतं, घरची परिस्थिती एकदमच सबळ, आणि त्यातच बाहेरून माहिती काढली तेव्हा सर्व जाणकारांनी जास्त खोलात न शिरता प्रथमदर्शनी दिसतं तसं सकारात्मक माहिती दिली, मग पूजाच्या घरच्यांनी तिला समजावून लग्नास तयार केलं, पूजाचा वैद्यकीय क्षेत्राशी काहीच संबंध नव्हता. तरीही डॉक्टर जावई मिळाला, या विचाराने तिचे कुटुंब जोरात लग्नाच्या तयारीला लागले, केवळ दोनच भेटीत विवाह ठरला आणि झालाही. पण लग्नाच्या वर्षाच्या आत पूजा माहेरी परत आली, ती पुन्हा कधीही सासरी परत न जाण्याचा निर्धार करून! कारण लग्नानंतर हळूहळू तिच्या ध्यानात येऊ लागलं की प्रवीण रोज कोणत्यातरी औषधाच्या गोळय़ा खातो आणि चुकून एखादा दिवस गोळी चुकली असता तो खूपच चिडचिड करतो, हिंसक होतो, रागाच्या भरात एक दोन वेळा त्याने पूजावर हातही उगारला होता, शेवटी त्रास असहय़ होऊन तिने एका डॉक्टरांकडे त्या गोळय़ाबद्दल विचारणा केली असता तिला कळले की ही मेंदू शांत ठेवण्याची औषधे आहेत. आणि प्रवीण एक मानसिक रुग्ण !
अशा प्रकारची फसवणूक वर किंवा वधू कोणत्याही पक्षाकरवी होऊ शकते. आणि अशा अनेक घटना आपण आधीच्या काळातही घडलेल्या ऐकत आलोय आणि आताही अशा अनेक घटना कानावर सर्रास पडत असतात. आधीच्या काळात कदाचित सामाजिक दबावामुळे याची वाच्यता करणे रास्त नव्हते आणि एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे घरातील वडिलधाऱयांकरवी असं प्रकरण आपापसात मिटवून तडजोडीचा संसार डगमगत का होईना पुढे चालू राहायचा. पण आज काळ बदललेला आहे. आजच्या काळात अशा फसवणुकीमुळे होणाऱया लग्नाची शोकांतिका थेट कोर्टात घटस्फोटानेच संपते, त्यात संसार तर तुटतोच पण त्यात गुरफटल्या गेलेल्या वधू /वरांच्या आयुष्याचीही हकनाक हानी होते.
आपल्याकडे विवाह जमताना व तो सुखी होण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा आधार घेतला जातो त्या दृष्टीने कुंडली जमणे आणि गुणमिलन याला खूप महत्व दिलं जातं पण आज काळाची गरज म्हणून कुंडलीबरोबरच काही व्यावहारिक बाबी पाहणे गरजेचे आहे. त्यातीलच एक म्हणजे लग्नाआधी मुलाची आणि मुलीची संपूर्ण शारीरिक आणि मानसिक तपासणी. म्हणजेच ‘मेडिकल सर्टिफिकेट’.
मला माहिती आहे आपल्या काही पारंपरिक, जुन्या विचारांच्या लोकांना हा विचार पचवणे थोडं अवघड जाऊ शकतं कारण मुळातच आपल्या हिंदू संस्कृतीत लग्नासारख्या पवित्र बंधनाचा वटवृक्ष विश्वासाच्या मुळावर उभारलेला असतो. त्यात शारीरिक किंवा मानसिक आजाराविषयीची तपासणी म्हणा किंवा त्याबद्दलच्या काही शंका याबद्दल वाच्यता करणे काहीसे अवघड जाऊ शकते. पण त्या होणे आज काळाची गरज आहे कारण त्याने अनेक धोके, विश्वासघात, फसवणूक टाळता येईल. या तपासणीमध्ये दोघांसाठी मुख्यतः 4 मुद्यांना महत्व द्यायला हवे .
- संतान प्रजनन क्षमता
- शारीरिक स्वास्थ्य – कोणता असाध्य रोग नाही ना ? किंवा वंशपरंपरेने उतरेल वा संसर्गाने एक दुसऱयाला लागू शकेल, असा रोग.
- वय
- व्यसन आणि त्यातून भविष्यात होणारी रोग उत्पत्ती.
आजचे तरुण – तरुणी आपण सुशिक्षित आहात, स्वतंत्र विचारांचे आहात. त्यामुळे वैद्यकीय तपासणीच्या दृष्टीने पहिलं पाऊल तुम्हीच पुढे सरसावू शकता, तुमच्या वडीलधाऱयांना या चाचणीचे महत्व आणि गरज पटवून सांगू शकता. तुम्ही जर हे आज करण्याची हिमत दाखवली तर जशी लग्न आधी कुंडली मीलनाची प्रक्रिया लग्नाचा एक भाग म्हणून पाहिली जाते तसंच काही वर्षात लग्नाआधी वैद्यकीय तपासणी ही पण एक लग्न ठरवण्यातील प्रक्रिया म्हणून स्वीकारली जाईल. आज आपल्यात असे काही जागृत पालक किंवा वधू – वर आहेत, जे लग्न ठरण्याच्या दृष्टीने वैद्यकीय चाचणी बाबत स्पष्टपणे विचारणा करतात पण दुर्दैवाने त्यामुळे त्यांना अनेक सामाजिक दोषारोपाना सामोर जावं लागतं. त्यामुळे अनुरूप असणाऱया कोणत्याही स्थळाने वैद्यकीय तपासणीची गळ घातली असता त्यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं दूषण मनात न ठेवता आनंदाने या प्रक्रियेला सामोरं जा! कारण रूप, रंग, उंची, देहयष्टी यासारखा विजोडा कदाचित व्यवस्थित संसार करू शकेल पण शारीरिक किंवा मानसिक विजोडा यांच्यात सुखी संसाराची शक्मयता नाहीच !









