सुमित्रेचा आनंद वाढवणारा तिचा प्रिय पुत्र लक्ष्मण रामाचाही अत्यंत लाडका होता. अन्यायाविरूद्ध पेटून उठणारा लक्ष्मण एरवी तितकाच विनयशील होता. म्हणूनच राम वनात जाण्यासाठी निघाला, तेव्हा त्याच्यावरील प्रेमामुळेच लक्ष्मणही त्याच्यासोबत गेला. त्याचबरोबर रामाची प्रिय पत्नी सीताही त्यांच्या मागोमाग निघाली. तिचे वर्णन एका श्लोकात केले आहे.
रामस्य दयिता भार्या नित्यं प्राणसमा हिता।
सीताप्यनुगता रामं शशिनं रोहिणी यथा।।…..
रामाला सीता आपल्या प्राणाइतकीच प्रिय होती. सीताही नेहमी रामाचे हित चिंतणारी होती. ती रामाशिवाय राजभवनात राहू शकत नव्हती. म्हणून चंद्राची पत्नी रोहिणी जशी सदैव चंद्राच्या मागून जाते, तशी सीतादेखील रामाच्या मागून गेली.
लक्ष्मण आणि सीतेसह श्रीराम वनात गेले, तेव्हा नगरवासी आणि राजा दशरथ खूप दूरपर्यंत त्यांच्या पाठोपाठ गेले. पुढे श्रुंगवेरपुरात राम त्यांचा प्रिय मित्र निषादराज गुहाला भेटले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत त्यांच्यासोबत आलेल्या सारथी सुमंत्राला-दशरथाच्या मंत्र्याला गंगाकिनाऱयावरून परत
पाठवले.
गुहाने ऐकले होते की, रामाच्या पदस्पर्शाने शिळेचे रूपांतर अहल्येत झाले. त्यामुळे श्रीराम जेव्हा नौकेत चढणार होते, तेव्हा गुहा त्यांना उद्देशून म्हणतो की,…
क्षालयामि तव पादपङ्कजं नाथ!
दारुदृषदोः किमन्तरम् ।
मानुषीकरणचूर्णमस्ति ते पादयोरिति कथा प्रथीयसि ।।….
हे नाथ, मी आपली चरणकमले आधी धुतो, लाकूड आणि दगड यांच्यात असा कितीसा फरक आहे? तुझ्या पायांना असे काही चूर्ण आहे, जे कोणत्याही वस्तुचे मनुष्यात रूपांतर करते, अशी कथाच प्रसिद्ध आहे! इथे गुहाला असे सुचवायचे आहे की, जणू तुझ्या पदस्पर्शाने या निर्जीव नौकेचेही माणसात रूपांतर झाले आहे…..अशा रामभक्त गुहाने त्या तिघांना गंगापार केले. नंतर ते तिघे भारद्वाज ऋषिंच्या आश्रमात गेले. ऋषिंनी त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. नंतर त्यांच्या आज्ञेनुसार चित्रकूट पर्वतावर जाऊन लक्ष्मणाने तेथील रम्य वनात बनवलेल्या सुंदर कुटिरात देव-गंधर्वांप्रमाणे तिघेही आनंदात राहू लागले.








