उत्तर रामायणात सीतेच्या अवतार समाप्तीनंतर श्रीराम आयुष्यातील अनंत दुःखांमुळे विरक्त झाले आहेत. त्यांनी आपल्या पुढील पिढीकडे आपला राज्यकारभार सोपवायचा विचार केलेला दिसतो. श्रीरामांचा बहिश्चर प्राण असलेल्या लक्ष्मणाशिवाय रामाला आणि रामाशिवाय लक्ष्मणाला अस्तित्वच नाही असे दिसते. असाच एक प्रसंग रामचरित्राच्या शेवटी दिसतो.
श्रीराम राजसभेत आपल्या सहकाऱयांसह राजनीतीवर चर्चा करीत असतानाच तिथे कालपुरुष आला. श्रीराम त्यांचे यथोचित स्वागत करतात. कालपुरुष म्हणतात, ‘ब्रम्हदेवाचा निरोप सांगण्यासाठी मी आलो आहे. मला तुमच्याशी एकांतात बोलायचे आहे. पण आपल्या एकांतात कोणाचाही व्यत्यय येता कामा नये, अशी माझी अट आहे. जो ही मोडेल, त्याला देहान्त प्रायश्चित घ्यावे लागेल.’ ही अट श्रीरामांनी मान्य केली. ते दोघेही आतील दालनात जातात, तेव्हा आपला जणू प्राणच असलेल्या लक्ष्मणाला द्वारापाशी थांबायला सांगतात. तसेच आमचे बोलणे पूर्ण होईपर्यंत आत यायचे नाही असेही बजावतात. लक्ष्मण त्यांची आज्ञा पाळतो आणि रामाचा द्वारपाल म्हणून तिथे पहारा देत उभा राहतो.
काळपुरुष श्रीरामांना म्हणतो, ‘ब्रह्मदेवांचा आपल्याला संदेश आहे की, पृथ्वीवरील आपले जीवितकार्य संपले आहे. तेव्हा आपण स्वर्गीय निवासस्थानाकडे प्रस्थान करावे.’ श्रीराम हा संदेश शिरोधार्ह मानतात. तेवढय़ात लक्ष्मण द्वारातून आत प्रवेश करतो. काळपुरुष श्रीरामाकडे नेत्रकटाक्ष टाकतो. अटीचा भंग झालेला असतो. परंतु हे दोघे वार्तालाप करीत असताना दुर्वास ऋषी तिथे येतात आणि ‘मला तातडीने रामाला भेटायचे आहे’ असा हट्टाग्रह धरतात. लक्ष्मण त्यांना विनवून सांगतो की, ‘श्रीराम एकांतात आहेत. त्यांना आता भेटता यायचे नाही. जो निरोप असेल तो मला सांगा. मी त्यांच्यापर्यंत पोचवतो.’
पण दुर्वास ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. ते लक्ष्मणाला संतापून म्हणता की, ‘माझी रामाशी भेट झाली नाही, तर मी अयोध्या जाळून भस्म करीन.’ हे ऐकून लक्ष्मण विचार करतो की, यांच्या शापाने अयोध्या भस्म होण्यापेक्षा मी एकांतभंग केल्यामुळे कालपुरुषाच्या अटीनुसार मला देहान्त शासन होईल. त्याला मी तयार आहे. म्हणून तो अचानक दालनात येतो आणि दुर्वासांचा निरोप सांगतो. नियमभंग केल्याने श्रीरामांना वचनपूर्तीसाठी प्रिय लक्ष्मणाला देहान्त शासन करावे लागते. श्रीरामांच्या प्राणांआधी त्यांच्या बहिश्चर प्राणांचे हरण होते. त्यानंतर थोडय़ा अंतराने श्रीराम शरयू नदीत आपला देह विसर्जित करतात. एका अवतार कार्याची समाप्ती होते.








