रावणवधानंतर रामानी बिभीषणाचा निरोप घेतला. ते सीतामाई आणि लक्ष्मणाबरोबर पुष्पक विमानाने अयोध्येला परतले. श्रीराम हे आदर्श शत्रू आहेत. त्यांनी रावणाच्या वधानंतर त्याचा भाऊ बिभीषणाला राज्य दिले. पण बिभीषणाने रावणाच्या मृत्यूनंतर त्याचा अग्निसंस्कार करायला नकार दिल्यानंतर श्रीरामांनी त्याला सांगितले की, ‘मरणाबरोबर माणसाचे वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसशील, तर तो मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’ शत्रूविषयीही असे उदात्त विचार करणारे श्रीरामांचे व्यक्तिमत्त्व होते. रावणाचा त्यांनी सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करवून घेतला! लक्ष्मण हा थोडा रागीट स्वभावाचा असल्याने एखाद्या गोष्टीवर तो पट्कन प्रतिक्रिया देत असे. म्हणूनच रावण मृत्यूच्या अंतिम घटका मोजत असताना रामांनी लक्ष्मणाला रावणाकडून ज्ञान घेऊन यायला सांगितले. तेव्हा प्रथम रावणाने त्याला ज्ञान घेताना एखाद्याच्या पायाशी नम्र होऊन शरण जाण्याचा पहिला धडा तर दिलाच. पण कोणतेही शुभ कार्य करायला टाळाटाळ करू नये. ते लगेच करावे. कारण आपल्या जीवनाचा भरवसा नसतो. ‘श्रीरामाला मी खऱया अर्थाने ओळखू शकलो नाही, म्हणून माझी अशी अवस्था झाली आहे’. हेही त्याने कबूल केले. म्हणून कोणत्याही शत्रूला कधीही कमी लेखू नये. आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे गुप्त रहस्य असेल, ते कोणाशीही उघड करू नये. कारण रावणाच्या नाभीत अमृतकुपी असल्याचे रहस्य हनुमानाने रामाला सांगितल्यामुळेच रावणाचा रामाने वध केला. अशा या प्रकांड पंडित, महाबलशाली आणि राजनीतीज्ञ उत्कृष्ट प्रशासक अशा लंकापती रावणाने लक्ष्मणाला दिलेले ज्ञान कोणत्याही काळात सर्वांना उपयोगी पडणारे आहे. अर्थातच लक्ष्मणालाही ते उपयोगी पडणार होतेच.
अयोध्येला परत आल्यावर श्रीरामांनी राज्यकारभारात लक्ष घातले. परंतु त्यांच्या मनात अनेकदा बिभीषणाचा विचार डोकावत असे. म्हणून एकदा ते बिभीषणाला भेटायला निघाले. तेव्हा भरतानेही लंकेला जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा लक्ष्मणावर राज्यकारभार सोपवून राम सीता आणि भरतासह ते पुन्हा लंकेला गेले. तेव्हा बिभीषणाशी संभाषण करत असताना त्यांनी राज्यकारभाराविषयी विचारले. बिभीषण निस्सीम रामभक्त होता. रामांनी त्याला ‘धर्माने राज्य कर. प्रजेमधे भेदभाव करू नकोस. अपत्यवत् तिचे पालन कर.’ इ. उपदेश केला. तसेच काही अडचण असल्यास सांगायला सांगितले. तेव्हा बिभीषणाने ‘युद्धाच्या वेळी या बांधलेल्या पुलाचा वापर एखादा शत्रू मला त्रास देण्यासाठी करू शकेल. मग लंकेला मी सुरक्षित कशी राखणार?’ अशी समस्या सांगितली. तेव्हा रामांनी आपल्या दिव्य बाणांचा वापर करून त्या पुलाचे तीन तुकडे करून तो नष्ट केला आणि शत्रूपासून लंकेला सुरक्षित केले.









