सीतेचे बोलणे ऐकून अधिकच क्रोधित झालेला रावण गरजला, ‘हे सीते, मी तिन्ही लोक, चौदा भुवने जिंकलेला महाप्रतापी लंकापती रावण आहे. माझे नाव ऐकून इंद्र, वरुण, कुबेर, सर्व देव-दानव, किन्नर, गंधर्व, यक्ष भयभीत होतात. माझी सेवा करण्यात धन्यता मानतात.
मी तुझे सौंदर्य पाहून माझ्या लावण्यवती राण्यांनाही विसरून गेलो आहे. तू माझ्याबरोबर आलीस तर, माझ्या लंकेचे सौंदर्य पाहून इथल्या वनातले कष्टपूर्ण जीवन विसरून जाशील….’ त्याचे हे उद्दामपणाचे बोलणे ऐकून सीतेचा क्रोधही अधिकच वाढला. ती त्याची निर्भर्त्सना करीत म्हणाली, ‘हे अधम राक्षसा, तू परमतेजस्वी, अद्भुत पराक्रमी आणि महान् योद्धा असलेल्या प्रभू रामचंद्रांचा पराक्रम जाणत नाहीस. तुझ्या डोक्मयावर काळ घिरटय़ा घालतो आहे म्हणूनच हा घृणास्पद प्रस्ताव घेऊन आला आहेस. तुझा मृत्यू तुझ्या अगदी समीप आला आहे.’ एवढे ऐकूनही तो बधत नव्हता. तो म्हणाला, ‘मी तुला नेण्यासाठी आलो आहे आणि तुला घेऊनच इथून जाणार
आहे.’
वामेन सीतां पद्माक्षीं मूर्धजेषु करेण सः।
ऊर्वोस्तु दक्षिणेनैव परिजग्राह पाणिना।।
असे बोलून रावणाने ब्राह्मणवेशाचा त्याग करून विक्राळ रूप धारण केले आणि वर वर्णन केल्याप्रमाणे डाव्या हाताने तिचे केस पकडून आणि दुसऱया हाताने पायाखाली हात धरून सीतेला उचलून आपल्या खांद्यावर घेतले. नंतर जवळच उभ्या असलेल्या विमानात सीतेसह जाऊन बसला. आपण पकडले गेलो आहोत हे समजल्यावर सीतेने ‘हे रामा, हा पापी रावण मला पळवून नेतो आहे, हे लक्ष्मणा, तू कुठे आहेस? तुझे समर्थ बाहू या दुष्टापासून माझे रक्षण का करीत नाहीत? हाय रे दैवा!, आज कैकयीची मनोकामना खरंच पूर्ण झाली!’ असा विलाप करीत राहिली.
वाटेतच तिला जटायू दिसला. त्याला बघून ती जोरात ओरडली, ‘हे जटायू, बघा, हा लंकेचा दुष्ट राजा माझे अपहरण करून घेऊन जात आहे. पण तुम्ही माझे रक्षण करू शकणार नाही. कारण हा तुमच्यापेक्षा बलवान आहे आणि विजयोन्मादाने तो हे दुस्साहस करत आहे. तुम्ही ही वार्ता माझे पती प्रभू रामचंद्रापर्यंत पोचवण्याचे कार्य मात्र अवश्य करा.’ सीता आपल्या सुटकेसाठी अशी धडपडत राहिली. पण आता तरी त्याचा काहीच उपयोग नव्हता.








