प्रतिनिधी /पणजी
समाजोन्नती संघटनेतर्फे दरवर्षी दिला जाणारा यंदाचा ‘समाजमित्र’ पुरस्कार मोरजी येथील समाजसेवक तथा कीर्तनकार ह.भ.प. विष्णूबुवा शेटगावकर यांना प्राप्त झाला आहे. संघटनेतर्फे दिला जाणारा हा 28 वा पुरस्कार असून सर्व समाजाप्रति समभाव असणाऱया क्रियाशील ज्येष्ठ व्यक्तींना महात्मा गांधीजयंतीदिनी खास सोहळय़ात निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जातो.
विष्णूबुवा हे मोरजी येथील विद्याप्रसारक विद्यालयामध्ये 42 वर्षे विद्यादानाचे कार्य करून मुख्याध्यापकपदावरून निवृत्त झाले आहेत. आदर्श शिक्षक, प्रभावी वक्ते, शैलीदार निवेदक, हौशी नाटय़कलाकार, समाजसेवक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. ‘कीर्तनकारबुवा’ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा झळाळून उठणारा पैलू आहे. पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक तसेच पुरस्कारप्राप्त नारदीय कीर्तनकारबुवा असा त्यांचा एकंदरित जीवनप्रवास आहे. त्यांना ईश्वरदत्त गोड गळय़ाची देणगी लाभली आहे. घरात संगीत वा कीर्तनाची पार्श्वभूमी नसतानाही केवळ कीर्तनाच्या ध्यासापोटी त्यांनी ह.भ.प. दत्तदास घाग, ह.भ.प. कऱहाडकर बुवा, ह.भ.प. कुबेरबुवा यांच्याकडून कष्टपूर्वक शिक्षण घेतले. आतापर्यंत त्यांनी गोवा, महाराष्ट्र, कारवार, खानापूरच्या ग्रामीण भागात तीन हजारांच्यावर कीर्तने केली आहेत. ‘नाचू कीर्तनाचे रंगी-ज्ञानदीप लावू जगी’ हे आपले ध्येय मानून कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. ‘इये कीर्तन-विद्या मंदिरी’ हे त्यांचे हल्लीच प्रकाशित झालेले कीर्तनविषयक पुस्तक होय. यात निवडक 9 पूर्वरंग व 9 उत्तररंग (आख्याने) यांचा समावेश आहे. त्यांना ‘समाज-मित्र’ हा पुरस्कार महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे, उद्योजक तथा समाजसेवक डॉ. प्रफुल्ल हेदे या मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल. याप्रसंगी संघटनेच्या ‘वाटचाल’ या स्मरणिकेचे प्रकाशन होईल. तसेच ज्येष्ठ सदस्य-कार्यकर्ते विष्णू जयराम बांदेकर यांचाही सन्मान करण्यात येईल. हा सोहळा 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, असे संघटनेचे अध्यक्ष शंभू बांदेकर यांनी कळविले आहे.









