चोरीसाठी गेलेल्या युवकाचे कृत्य, मुरगोड पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी / बेळगाव
होसूर (ता. सौंदत्ती) येथील मडिवाळेश्वरमठाच्या स्वामीजींवर कोयत्याने हल्ला झाला आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली असून चोरीसाठी आलेल्या एका युवकाने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. मुरगोड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.
गंगाधर महास्वामीजी (वय 62) असे जखमी स्वामीजींचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून हल्ल्यात स्वामीजींच्या हाताला, मानेला आणि डोक्मयाला दुखापत झाली आहे. बैलहोंगल येथील तालुका इस्पितळात उपचार करुन त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी मल्लिकार्जुन महादेवाप्पा बुडशेट्टी (वय 36, रा. होसूर) याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असून न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
जखमी गंगाधर स्वामीजींनी दिलेल्या माहितीनुसार नेहमी प्रमाणे रात्रीचे जेवण आटोपून ते मठात झोपले होते. 12 वाजण्याच्या सुमारास दरवाजा उघडल्याचा आवाज आला म्हणून त्यांनी बाहेर कोण आहे, असे दोन ते तीन वेळा हाक मारली. बाहेरुन कोणताच प्रतिसाद आला नाही.
12.30 वाजण्याच्या सुमारास पुन्हा आवाज आला. त्यावेळी स्वामीजींनी आपल्याखोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता हातात कोयता व पक्कड घेवून एक युवक थांबला होता. स्वामीजींनी तु कोण आहेस आणि कशासाठी येथे आला आहेस, अशी विचारणा केली. यावेळी मीच आहे कबुतर पकडण्यासाठी आपण येथे आल्याचे त्याने सांगितले.
स्वामीजींनी तुझ्या हातात पक्कड व कोयता कशासाठी, अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने लगेच स्वामीजींवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्याने जखमी झालेल्या स्वामीजींनी आरडाओरड करताच मठात झोपलेल्या इतर भाविकांना जाग आली. त्यांनी तातडीने स्वामीजींना बैलहोंगलला हलविले. त्यानंतर त्यांना बेळगावला हलविण्यात आले.
काळय़ा यादीतील गुन्हेगार

पोलिसांनी अटक केलेल्या मल्लिकार्जुन बुडशेट्टी हा काळय़ा यादीतील गुन्हेगार आहे. चोरी, दरोडा, खून प्रकरणात त्याला यापूर्वी अनेकवेळा अटक झाली होती. टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या एका खुन प्रकरणात अलिकडेच त्याची जामीनावर सुटका झाली होती. बेळगाव येथील टिळकवाडी, मुरगोड व बैलहोंगल पोलीस स्थानकात त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत.









