प्रतिनिधी/कुदनूर
होसूर येथील ममता सिताराम व्हडगे (वय २३) हिचे अपघातात दूर्दैवी निधन झाले. ममताच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. रविवार दि. १३ फेब्रुवारीला ती आपल्या भावाच्या दुचाकीवरून गावच्या लक्ष्मी यात्रेच्या निमित्त खरेदीसाठी कोवाड येथे आली होती. कोवाड येथे खरेदी करून परतत असताना कागणी मार्गावर त्यांच्या दुचाकीचा अपघात घडला. अपघातात तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली तर भावाला जबर मार बसला. त्या दोघांना तत्काळ बेळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली.
ममताचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून, ती पुण्यात नोकरी करत होती. होसूर गावच्या लक्ष्मी यात्रेसाठी ती दोन दिवसापूर्वी गावी आली होती. लक्ष्मी यात्रेची तयारी सुरू असतानाच तिच्यावर काळाने घाला घातल्याने होसूर गावासह परिसरात शोककळा परसरी आहे. मतताच्या पश्चात वडील, आई, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे. सोमवार दि. १४ रोजी शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, रक्षाविसर्जन गुरुवार दि. १७ रोजी सकाळी करण्यात येणार आहेत.









