होळी उत्सव आनंदाने, उत्साहाने साजरे करतात. आदल्या दिवसापासूनच होळी दहनासाठी लाकडे, झाडाच्या फांद्या जमविल्या जातात. काही ठिकाणी ही लाकडे चोरूनही आणली जातात. त्यावर रंगबिरंगी कपडय़ाचे तुकडे बांधले जातात. सर्वजण झाडाच्या त्या फांदीला कापडाचा एक तुकडा बांधतो. ती फांदी कपडय़ांच्या तुकडय़ांनी पूर्णपणे झाकली जाते, नंतर तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते. त्याच्यावर गवत, वाळलेली लाकडे, गोवऱया, केळी, इतर फळे रचली जातात. मुहूर्तावर होळीचे पूजन करून मुख्यतः पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. नंतर होळीचे दहन केले जाते. दहन करताना ’होळी रे होळी पुरणाची पोळी…’ अशी घोषणाबाजी केली जाते.

जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच, होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता, जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा. तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणेदेखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळय़ा प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. ह्या सगळय़ाला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रह्लादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोडय़ाच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं कि तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेंव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रह्लाद ला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखू लागले. दुसऱया दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले.

होळी संपूर्ण भारतात साजरी केली जाते परंतु उत्तर भारतात जास्त उत्साहात साजरी केली जाते. होळीचा हा सण पाहण्यासाठी लोक वृज वृंदावन, गोकुळ अशा ठिकाणी जातात.
आणि ह्या ठिकाणी होळीदेखील बरेच दिवस साजरी केली जाते.
होळीच्या दिवशी घरी बरेच पक्वान्न केली जातात. स्वादाने भरलेल्या ह्या भारत देशात सणाच्या
दिवशी वेगवेगळय़ा प्रकारचे चविष्ट जेवण केले जाते.
होळीला घ्यायची काही काळजी…
- होळी हा रंगांचा सण आहे परंतु सावधानता पाळणे अधिक गरजेचे आहे. कारण आजकाल मिळावटवाल्या रंगामुळे खूप नुकसानाना सामोरे जावे लागते. त्यामुळे गुलालाने होळी खेळणे जास्त सोयीस्कर आहे.
- तसेच आजकाल भांगमध्ये देखील बरेच अन्य नशिले पदार्थ मिसळले जातात त्यामुळे अशा पदार्थापासून सावध राहणे गरजेचे आहे.
- चुकीच्या रंगामुळे डोळय़ांना हानी पोहचू शकते त्यामुळे असे रसायन मिसळलेले रंग वापरू नये.
- घराबाहेर बनवलेली कोणतीही वस्तू खाण्या अगोदर विचार करावा कारण अशा सणांना मिळावट होण्याची अधिक शक्मयता असते.
- सावधानतेने एकमेकांना रंग लावावे. कोणाची इच्छा नसेल तर उगाच जबरदस्ती रंग लावू नये. आजकाल होळीसारख्या सणांना भांडण होण्याचे प्रमाण वाढले आहे.
- होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे आणि तो तसाच साजरा करावा.










