आज होळी. सारे हीन, टाकावू, त्याज्य जाळून टाकायचे आणि नवे चांगले स्वीकारून आदर्श परंपरा जपायची. एकमेकांच्या अंगावर रंगाची उधळण करत नववर्षाच्या स्वागताला सज्ज व्हायचे. साऱया हिंदुस्थानात आणि देश-विदेशात जिथे-जिथे भारतीय आहेत तेथे-तेथे हा उत्सव साजरा होतो. कोकणात तर होळीचे वेगळे महत्त्व आहे. काही ठिकाणी होळी, धुळवड आणि रंगपंचमी असे सण पाठोपाठ साजरे केले जातात. यंदा तर महिला दिनाला आणि शनिवार-रविवार जोडून होळी आल्याने उत्साह आहे. कोकण तर शिमगोत्सवासाठी आनंदले आहे. मुंबईचे चाकरमानी रेल्वेच्या गाडय़ा भरभरून कोकणात दाखल होत आहेत. घरोघरी पुरणपोळीसाठी तयारी आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्जता आणि स्वच्छता सुरू झाली आहे. देशात होळी-रंगपंचमीला उत्सव आणि उत्साह असला तरी जगभर कोरोनाची दहशत आहे. चीन व काही देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. थंडी संपून सूर्य प्रखर होईल तसा कोरोना संपेल असे म्हटले जाते आहे आणि थंडीला संपवून चैत्राचे स्वागत करण्यासाठीचा बिगुल म्हणून होळीकडे बघितले जाते. होळीचा संबंध स्वच्छतेशी आणि निसर्गाशी जोडलेला आहे. गारठून गेलेले पक्षी-प्राणी, वनस्पती होळीतून नवी ऊर्जा घेतात अशी कल्पना आहे. वनस्पतीची याच दरम्यान पानगळ झालेली असते आणि चैत्र पालवीची चाहूल लागलेली असते. नवे पंचांग, नवे वर्ष, नवे धान्य, नवी हवा, नवी फळे, फुले अशा सारा नव्याचा उत्सव सुरू होतो. निसर्गसुद्धा पाने, फुले, फळे यानिमित्ताने रंगपंचमी खेळतो. कोकीळेलाही कंठ फुटतो. एकूणच होळी-रंगपंचमी नव वर्षाची नवलाई आणि रंग, दिमाख घेऊन सरसावते. साहजिकच मानवी मन आनंदते. या निसर्ग उत्सवात भरभरून बहरते. रब्बीचे गहू, हरभरे आदी धान्य पदरात आल्याने शेतकरी खुश असतात. आंब्यांना मोहोर आणि काजूला फळधारणा होते. द्राक्ष, डाळिंब बहरात असतात. ओघानेच आनंदी आनंद असतो. उत्तर भारतात होळी सारखाच फागून सण साजरा होतो. महाराष्ट्रात होळीला पोळी आणि धुळवडीला नळी असते. होळीची पूजा होते. साफसफाई करून गावोगावी होळी पेटवली जाते. नव्या जमान्यात होळी पेटवू नका. लाकडे, शेणकुटे जाळू नका, रंगपंचमीला रासायनिक रंग वापरू नका असे सांगण्यात येते आहे. त्यामागे शास्त्राrय व आरोग्य विचार आहे आणि तो बरोबर आहे. रासायनिक व शरीराला घातक रंग वापरल्याने अनेक दुर्घटना घडतात हे वारंवार दिसून आले आहे. पण त्यासाठीचा संयम आणि भान पाळले जात नाही हे दुर्दैव आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रंगपंचमीकडे अधिक जबाबदारीने आणि आरोग्यहितावर लक्ष ठेवून राहिले पाहिजे. रंगपंचमी नको असेच आवाहन होत आहे आणि ते चुकीचे नाही. पर्यावरण हा आजघडीचा सर्वात स्फोटक आणि महत्त्वाचा विषय आहे आणि होळीचा उद्देश तोच असेल तर पर्यावरण रक्षण होळी व रंगपंचमीचा केंद्रबिंदू असला पाहिजे. बदलते हवामान, प्रचंड लोकसंख्या, दूषित नद्या, विहिरी, हवा-पाण्याचे प्रदूषण, वाढते तापमान, ढगफुटी, रोगराई, वेगवेगळे रोगजंतू, आजार या पार्श्वभूमीवर होळी साजरी करताना आणि रंगपंचमीचे रंग उधळताना नवे पायंडे व भूमिका घेतली पाहिजे. कोरोनामुळे चीन अडचणीत आहे. टोळधाडीने पाकिस्तान संकटात आहे. प्राणी-पक्षी जीवन संकटात आहे. या पार्श्वभूमिवर चीनमधील मालावर बहिष्कार आणि पर्यावरण रक्षण हाच यंदाच्या होळीचा मुख्य गाभा आहे. चीनमधून रंग, रंगाच्या पिचकाऱया आणि फटाके वगैरे ज्या वस्तू येतात त्यावर बहिष्कार घातला पाहिजे. त्यामुळे कोरोना सारख्या संकटाची भीती नाही आणि देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी मदतही होणारी आहे. होळी व रंगपंचमी केवळ वरवरच्या स्वच्छतेपुरती व रंगासाठी नाही. मनाची स्वच्छता आणि मनात नवे रंग, नवे गंध, नवे उन्मेश, नव प्रतिभा हा या सणांचा प्रधान हेतू आहे. देशात, विशेषत: महाराष्ट्रात आज जातीय व धार्मिक राजकारणाने किळस यावा असे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय पक्ष आणि जातीय मतपेटय़ा आणि संकुचित स्वार्थ त्याला जबाबदार आहेत. प्रत्येक गोष्टीकडे जात, भाषा, प्रांत, धर्म यांचे चष्मे लावून पाहिले जाते आहे. सैनिक असो, सेनाधिकरी असो, कलाकार असो, अभिनेता असो किंवा वक्ता, विचारवंत असो जात बघून त्याला टोचले जाते आहे आणि या जात या विषयावर आपली राजकीय दुकानदारी चालवली जाते आहे. आम्ही सारे भारतीय आहोत हे म्हणण्यापुरते आहे. प्रत्यक्षात आम्ही आमच्या जाती आणि जमाती सांभाळत आहोत. जातीयवाद, धर्मवाद संपवला पाहिजे हे म्हणण्यापुरते आहे. सांगण्यासाठी एक कार्यक्रम आणि करण्यासाठी वेगळा कार्यक्रम हा मुखवटा अनेकांनी धारण केला आहे. तो टराटरा फाडण्याची व खऱया अर्थाने जातीयवाद, धर्मवाद संपवून देशहिताची भूमिका घेणे गरजेचे आहे. पण काही मंडळींना हे मुखवटे चढवून आपली पोळी भाजून घ्यायची आहे. आपली पोळी भाजून निघते याचा त्यांना आनंद असला तरी त्यामध्ये देशहित, लोकहित नाही. हिंदुस्थानची शक्ती वाढवणारी ही बाब नव्हे. नेते म्हणून घेणाऱयांना याचे भान हवे आणि ते नसेल तर लोकांनी त्यांना भानावर आणले पाहिजे. जनतेने आपले शहाणपण जागवले पाहिजे आणि सर्वधर्म समभाव व देश कल्याण याची प्रचिती दिली पाहिजे. यंदाच्या होळीचा, रंगपंचमीचा तो संदेश आहे. जगभर मंदीचे वातावरण आहे. चीन, कोरिया, जपान, पाकिस्तान कोरोना व मंदीने संकटात आहेत. तेथील थंड हवामान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवत आहे. अशावेळी आपली होळी आणि समोर असलेला उन्हाळा लक्षात घेता आपणास मोठी संधी आहे. जात, पात, धर्म व संकुचित राजकारण मागे टाकून आपण या मंदीत संधी शोधली पाहिजे. अशी संधी आपण साधली तर होळी रंग आणल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठीचा विश्वास आणि निर्धार हवा. जात, धर्म, संकुचित राजकारण आणि लोकांना भरकटणारे विचार या होळीत भस्म करुया आणि नव्या हिंदुस्थानच्या, सर्वश्रेष्ठ हिंदुस्थानच्या ज्ञानेश्वरांचे पसायदान अनुभवणाऱया हिंदुस्थानच्या निर्मितीचा विचार करुया. होळीचा तोच खरा रंग आहे. देशहिताचा तोच संदेश आहे. होळी सणाच्या सर्वांना शुभेच्छा.
Trending
- schedule
- इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
- दीपक, कमलजीत, राज चंद्रा यांना सांघिक सुवर्ण,
- सावंतवाडी शहरातील रस्ते आणि स्वच्छता व्यवस्थेची दूरवस्था
- न्हावेली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- शिवसंस्कारच्या माध्यमातून सावंतवाडीत इतिहास अभ्यासकांचा होणार सन्मान
- भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत
- रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर कामगार सेनेचे जोरदार आंदोलन