प्रतिनिधी / वास्को
मुरगाव तालुक्यातील बोगमाळोजवळच्या होळांत येथील मच्छिमारांच्या जाळय़ात भंपर मासळी लागल्याने या किनाऱयावर एकच गोंधळ उडाला. ही मासळी शेवटी भरतीच्या लाटांबरोबर पुन्हा समुद्राकडे वळली. परंतु किनाऱयावर जीव सोडलेली मासळी पुन्हा किनाऱयावर आली. ती मच्छिमारांना किनारा स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने पुन्हा समुद्रात टाकावी लागली. परंतु ती मासळी पुन्हा किनाऱयावर येण्याची शक्यता आहे.
स्थानिक मच्छिमारांनी घातलेल्या रापणीच्या जाळात ही मासळी अडकली. मिश्र प्रकारची ही मासळी बंपर होती. संपूर्ण किनाराच या मासळीने व्यापला होता. त्यामुळे किनाऱयावर लोकांचीही गर्दी पडली होती. या मासळीचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. काहीनी शक्य तेवढी मासळी उचलली. अतिरिक्त मासळीचा प्रश्न समुद्राला भरती आल्याने शेवटी मिटला. मात्र, मृत माशांची अडचण तशीच राहिली. सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. स्थानिक पंचायतीलाही या प्रश्नात लक्ष घालावे लागले.









