26 एप्रिल ही प्राथमिक तारीख होती; 35 हजार विद्यार्थी देणार परीक्षा – प्र-कुलगुरू देबेंद्रनाथ मिश्रा यांची माहिती
सोलापूर/प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा 26 एप्रिल ऐवजी 3 मे पासून सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू देबेन्दनाथ मिश्रा यांनी `तरुण भारत संवाद’शी बोलताना दिली.
दरम्यान 26 एप्रिल ही तारीख प्राथमिक स्वरूपाची होती. महाविद्यालयातील त्रुटी पूर्ण झाल्या असून 3 मे ते 25 मे पर्यत परीक्षा घेण्याचे नियोजन असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा या ऑफलाइन घेण्याचे नियोजन केले होते. मात्र सोलापूर शहर जिह्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्यामुळे ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात 26 एप्रिल पासून परीक्षा सुरू होतील असे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र आता 30 एप्रिल पर्यंत संपूर्ण राज्यभर कडकडीत बंद लागू केल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचणी येणार म्हणून विद्यापीठाने परीक्षाचे वेळापत्रक त्रुटी दूर करून तीन मे पासून घेण्याचे नियोजन केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि महाविद्यालय संलग्नित पारंपारिक आणि व्यवसायिक अशा 101 महाविद्यालयांमधील 35 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. अभियांत्रिकी व फार्मसीच्या विद्यार्थ्यांची प्रथम व द्वितीय सत्र परीक्षा एकाच वेळी सुरुवात होणार आहे.
परीक्षा नियोजित वेळेत होणार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत. 26 एप्रिल ही प्राथमिक स्वरूपाची तारीख होती. महाविद्यालयीन अडीअडचणी दूर करून आता 3 मे पासून परीक्षा सुरू होणार आहेत. – डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्र-कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ