केंद्र सरकारचा राज्यांना इशारा- नियमांचे कठोरपणे पालन करण्याची सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात अनेक राज्यांत कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. देशात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. त्यामुळे उंबरठय़ावर ठेपलेल्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना काही निर्देश दिले आहेत. कोविड-19 च्या निर्देशांचे आणि नियमांचे कठोर पालन करण्याचे बजावले आहे. मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्स पाळणे, साबणाने सातत्याने हात धुणे आणि स्वच्छता राखा असे आपल्या निर्देशात केंद्राने म्हटले आहे. तसेच लसीकरणाला वेग देण्याची सूचनाही केंद्र सरकारकडून राज्यांना करण्यात आली आहे. देशभरात आतापर्यंत 4 कोटी 20 लाख 63 हजार 392 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे राज्यांना कोरोना नियमांबाबत सूचना केल्या आहेत. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी हे निर्देश दिले आहेत. राज्य व केंद्रशासित प्रदेशांना कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीची पावले उचलण्याची सूचना केली आहे. केंद्रीय गृह सचिवांना सर्व राज्यांना पत्र पाठवूनही नियमावलीची रुपरेषा पुन्हा एकदा समजावून सांगितली आहे.
राज्यांकडून सावधगिरीच्या उपाययोजना
देशात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा चिंता सतावू लागली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक राज्यांनी पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, पंजाब, मध्यप्रदेश, दिल्ली या राज्यांनी नियमावली अधिक कडक करण्यासाठी निर्देश जारी केले आहेत. गेल्या आठवडाभरात संसर्गबाधितांमध्ये झपाटय़ाने वाढ होत असल्यामुळे सर्वच राज्ये अधिक सतर्क झाली आहेत. तसेच कोरोना चाचण्यांचा वेग वाढविण्यात आल्याने बाधितांमध्येही वाढ होताना दिसत आहे.
देशात दिवसभरात 40,953 नवे रुग्ण
देशात गेल्या चोवीस तासात 40 हजार 953 नवे कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या चार महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. याशिवाय दिवसभरात 23 हजार 653 जण उपचाराअंती बरे झाले असून 188 मृत्यूंची नोंद झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. देशात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 1 कोटी 15 लाख 55 हजार 284 इतकी झाली असून 1 कोटी 11 लाख 7 हजार 332 जण उपचाराअंती बरे झाले आहेत. सध्या देशात 2 लाख 88 हजार 394 सक्रिय रुग्ण आहेत. तर मृतांची संख्या 1 लाख 59 हजार 558 इतकी आहे.









