प्रतिनिधी/ पणजी
कोविड-19 च्या लॉकडाऊनचा परिणाम! गोवा पेटून उठलाय. भातशेती आणि फळ लागवड तसेच भाजी उत्पादन वाढीसाठी कृषीमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर म्हणाले, गोवा पुन्हा एकदा कृषीप्रधान राज्य बनवतोय. प्रथमच 14 हजार पडिक शेत जमिनीत नांगरणी झालीय व शेतीही झाली. 300 किलो भाजी बियाणांच्या जागी यावर्षी 1500 किलो बियाणांची विक्री झालीय. कृषी उत्पादनात दुप्पटीपेक्षाही वाढ होणार आहे.
राज्याचे कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी राज्यात प्रचंड प्रमाणात शेती उत्पादनाचे ठेवलेले उद्दीष्ट प्रत्यक्षात साकारले जात आहे. अनेक पडिक शेतजमीन यावर्षी अनेक वर्षाच्या खंडानंतर प्रथमच नांगरल्या गेल्या. मातीलाही आपल्यामध्ये काहीतरी पेरले जावे जेणेकरून येथील भूमिपुत्रांना चार घास भरविता येईल असे वाटून या जमिनी अक्षरश: आसुसलेल्या.
कोविड 19 मुळे अनेक जण बेकार पडलेत. कामधंद्यात कमाई नाही. पगार व्यवस्थित मिळत नाही. किमान अन्नधान्य तरी मिळावे या उद्देशाने हजारो हात कामाला लागले आणि गोव्याच्या या लाल मातीत असलेले सोने उगविण्याची ताकद ओळखण्यासाठी नव्या पिढीने चिखलात पाय ठेवले.
अनेक घरांना पोट कसे भरायचे हा प्रश्न
अनेक वर्षांच्या खंडानंतर जनतेला देखील शेती हीच खरे शाश्वत असल्याचा साक्षात्कारही होऊ लागलाय. विकासात हळूहळू बदल होतोय, अनेक घरांना दोन वेळचे पोट कसे भरायचे हा प्रश्न सध्या उभा आहे. कोणीही राजकीय नेते मदत करू शकत नाहीत. सरकारची तिजोरीही खाली. अशा वेळी असलेली जमीन आणि उपलब्ध असलेले पाणी याचा वापर करून मार्च, एप्रिलमध्ये ज्यांनी ज्यांनी भाजी लावली त्यामुळे मे मध्ये बऱयाच जणांना भाजी उपलब्ध झाली. आता पावसाळय़ातील शेतीकडे अनेकांचा कल दिसून आला.
दुप्पट, तिप्पटीने बी बियाणे विकली
कृषी खात्याने यावर्षी दुप्पट, तिप्पटीने बी बियाणे विकली. सर्व बियाणेही सवलतीच्या दरातच उपलब्ध केली. भाजीपाल्याची लागवड यावर्षी गोव्यात मोठय़ा प्रमाणात होतेय. 300 किलो बियाणे जात असे त्या जागी कृषी खात्यानेच 1500 किलो भाजीपाल्याच्या बियाणांची विक्री केली, असे कवळेकर म्हणाले.
भातशेती तर यावेळी दुप्पटीने लागवडीखाली आलेली आहे. यंदा उत्पादन भरघोसपणे येईल. भाजीपाला फळफळेही मोठय़ा प्रमाणात मिळतील. शिवाय भात उत्पादनही दुप्पटीने वाढीस जाईल. आपण फार समाधानी आहे. यावर्षी कृषी क्षेत्रात गोवा क्रांतिकारी पाऊल टाकीत आहे. जनतेलाही आता पूर्वीचे दिवस आठवतील. गोव्यातील पडिक जमीन दिसता कामा नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यात आम्ही यशस्वी होणार आहोत. होय ! गोवा मला पुन्हा एकदा कृषी प्रधान बनवायचा आहे, असे बाबू कवळेकर म्हणाले.









