प्रतिनिधी / बेळगाव
परदेशातून बेळगावला आलेल्या सुमारे दीड हजारहून अधिक जणांना जिल्हा प्रशासनाने घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, अनेकजण हा सल्ला डावलून बाहेर फिरताना आढळून येत आहेत. कुत्रा घेऊन फिरायला गेलेल्या अशाच एका युवकाची पोलीस अधिकाऱयांनी क्लास घेतल्याची घटना रविवारी सकाळी घडली.
माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांना एक माहिती मिळाली. श्रीनगर परिसरात वास्तव्यास असलेला एक युवक दुबईहून परतल्यामुळे त्याला 28 दिवस घरीच राहण्याचा सल्ला आरोग्य विभागातील अधिकाऱयांनी दिला आहे. यासाठी कोणत्या खबरदारी घ्यायच्या याच्या सूचनाही त्यांना दिल्या आहेत.
28 दिवस पूर्ण होण्याआधीच श्रीनगरमधील एक युवक फिरण्यासाठी घराबाहेर पडल्याची माहिती पोलीस अधिकाऱयांना मिळाली. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर हे स्वतः तो युवक राहत असलेल्या घराजवळ पोहोचले व त्याला बोलावून त्याची क्लास घेतली. पोलीस अधिकारी त्याच्या घरी पोहोचले त्यावेळी या युवकाने मास्कही घातला नव्हता.
28 दिवस होम क्वारंटाईनची मुदत पूर्णहोईपर्यंत घराबाहेर पडू नका. घरी लहान मुले आहेत त्यांनाही जपा, तुमच्यासारख्यांच्या दुर्लक्षपणामुळे समाजातील इतर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकारेपणे पालन करा, क्वारंटाईनची मुदत संपण्याआधीच घराबाहेर पडलात तर कसल्याही प्रकारची दया-मया न दाखविता तुमच्यावर एफआयआर दाखल केला जाईल, असा इशारा पोलीस अधिकाऱयांनी युवकाला दिला.
बेळगाव शहरातील वेगवेगळय़ा उपनगरात अनेक संशयितांना 14 ते 28 दिवस घरी स्वतःला बंदिस्त राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. मात्र, हा सल्ला डावलून अनेकजण बाहेर फिरताना दिसत आहेत. होम क्वारंटाईन राहण्यासाठी ज्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आले आहेत. ते बाहेर फिरताना दिसत आहेत. आरोग्य विभाग व पोलीस दलाने त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे.