राजू भिकारो नाईक / पणजी

म्हापशातील समाजसेवी उद्योजक प्रदीप घाडी आमोणकर यांनी कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात गरजू लोकांना मदतीचा हात पुढे केला असून कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या होम आयसोलेशनमधील ज्या रुग्णांना जेवण मिळणे अवघड झाले आहे, अशांना त्यांच्या घरी मोफत जेवण पोहोचविण्यासाठी ‘प. पू. स. स. राऊळ महाराज अन्नछत्र’ हा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे.
या महामारीच्या काळात प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कार्यरत राहिल्यास महामारीवर मात करणे शक्य होऊ शकते. हाती पैसा असूनही अनेकांचे हाल होत आहेत, मग गरीबांचे काय होईल, मदतीसाठी कोणी नसणाऱयांचे काय हाल होणार, याची कल्पनाही करवत नाही. अशा या संकटाच्या काळात अडचणीत सापडलेल्यांना या ना त्या मार्गाने मदत करण्यासाठी काहीजण वैयक्तिकपणेही पुढे येतात आणि मदत करतात, ही समाधानाची बाब आहे. अशाच लोकांमध्ये प्रदीप घाडी आमोणकर हे अन्नदानाचे कार्य करत आहेत.
दोन्ही प्रकारचे जेवण उपलब्ध
‘प. पू. स. स. राऊळ महाराज अन्नछत्र’मध्ये शाकाहारी तसेच मांसाहारी अशा दोन्ही प्रकारची जेवणे दिली जात आहेत. जेवणातील पदार्थ रोज वेगवेगळे दिले जातात. मांसाहारमध्ये भात, चिकन करी, चिकन सुका, तांबडी भाजी, चपाती, अंडे व केळे तर शाकाहारामध्ये भात, अळसांदे, चणे तोंडाक, बटाट किंवा तांबडी भाजी, डाळ, तडका डाळ, टॉमेटो सार, चपाती, केळे दिले जाते. रोज हे पदार्थ बदलले जातात.

अन्नछत्र पूर्णपणे मोफत
हे जेवण पुर्णपणे मोफत दिले जात असून गरजूची जात, धर्म पाहिली जात नाही किंवा तो गरीब आहे की श्रीमंत हे ही पाहिले जात नाही. ज्या आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना कोणी जेवण देऊ शकत नाही, त्या रुग्णांना हे जेवण घरपोच दिले जाते. ज्याला हे जेवण हवे असेल त्यांनी त्या दिवशी सकाळी 8.30 वाजेपर्यंत प्रदीप घाडी आमोणकर यांना 9960466677 किंवा 7028715783 या फोन नंबरवर संपर्क साधून आपली नाव नोंदणी करण्याची आवश्यकता आहे. म्हापसा शहरातील आणि शहर परिसराच्या भागातील रुग्णांना ही सेवा देण्यात येत आहे.
दोन महिन्यांपर्यंत चालणार उपक्रम
आमोणकर यांना या सामाजिक उपक्रमाबद्दल विचारले असता सध्या चांगला प्रतिसाद मिळत असून आम्ही नावनोंदणी करणाऱया सर्वांना त्यांच्या घरी नेऊन जेवण देतो, असे सांगितले. सध्या सुमारे 50 जणांना जेवण देण्याची व्यवस्था असून ही संख्या वाढली तरी सर्वांना देण्यात येईल. पुढील दोन महिन्यांपर्यंत हे अन्नछत्र चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आपल्या परीने सर्व ते प्रयत्न आपण करणार असून बाकी सर्व महाराजांची कृपा आहेच, असे ते म्हणाले.
हे करताना मिळणारे आत्मिक समाधान खूप मोठे आहे!
आमोणकर यांना या उपक्रमाच्या व्यवस्थेबाबत विचारले असता त्यांनी माहिती दिली की या उपक्रमांतर्गत आवश्यक असलेले जेवण तयार करण्यासाठी आपण स्वयंपाकी नेमला आहे. त्याला आपली पत्नी व मुले सहकार्य करतात. जेवण तयार करण्याचे काम सकाळी लवकर सुरु होते. जेवण पौष्टिक, स्वादिष्ट तसेच शक्तिवर्धक असेल, असे पाहिले जाते. आपले संपूर्ण कुटंब यात योगदान देत आहे. त्यांनाही त्यात आनंद मिळत आहे. रुग्णांना जेवण गरमागरम मिळावे यासाठी व्यवस्थित डबे, फॉईल पॅक करुन एकेका पिशवीमध्ये एका रुग्णाचे जेवण घालून स्कूटरने त्याच्या घरापर्यंत पोहोचविले जाते. हे सारे करताना खूप आत्मिक समाधान मिळते. महाराजांच्या कृपेनेच आपल्याला व कुटुंबाला ही सेवा करण्याची संधी मिळाली आहे, असे ते मानतात.
आपणही कोरोनातून सहीसलामत बाहेर पडलो आहे. आजाराच्या काळात काय यातना भोगाव्या लागतात, घरच्या लोकांना किती त्रास पडतात याची कल्पना आहे आपल्याला. समाजात कुणाची मदत न मिळणारे अनेक लोक आहेत. सध्याच्या या संकटाच्या काळात अनेकांची उपासमार सुरु असल्याचेही आपण पाहिले आहे. होम आयसोलेशनमध्ये असणाऱयांना तर खूपच त्रास होत असतो, कारण कोण त्यांच्या घरापाशी जायला तयार नसतात, त्यांच्याशी बोलायलाही तयार नसतात, अशावेळी आपण राऊळ महाराजांच्या कृपेचे हे अन्नछत्र त्यांना त्यांच्या घरी जाऊन द्यावे, असे सुनिश्चित केले आणि त्याप्रमाणे सर्वकाही सुरु आहे. ही सारी प. पू. स. स. राऊळ महाराजांची कृपा आहे, आपण फक्त निमित्तमात्र आहे, असेही आमोणकर म्हणाले.









