प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्ह्यातील ज्या रुग्णांना होम आयसोलेशन होणे जागेअभावी शक्य होत नाही, त्यांच्यासाठी रयत शिक्षण संस्थेतील परिपूर्ण सुविधा असलेली महाविद्यालये ताब्यात घेऊन तेथे विलगिकरण कक्ष उभारण्यात यावेत, अशा सूचना खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या. दरम्यान, पीएम केअर फंडातून जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्टबरोबरच एनडीआरएफ आणि एसडीआरएफ या फंडातून सातारा जिह्यात 17 ऑक्सिजन प्लॅन्ट उभे करण्याचे नियोजन केलेले आहे. जिल्हा प्रशासनाला लागेल ती मदत करण्यास आम्ही कटीबद्द आहोत, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सुनील काटकर, ॲड. दत्ता बनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये पीएम केअर फंडातून क्रांतिसिंह नाना पाटील सातारा जिल्हा रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट बरोबरच संपूर्ण जिल्ह्यात नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड आणि स्टेट रिलीफ फंडाच्या माध्यमातून अतिरिक्त 17 प्लांट उभे करण्याचे नियोजन केले आहे. यातील 12 ऑक्सिजन प्लांट विविध ग्रामीण रुग्णालय येथे उभारण्यात येणार आहेत. त्याची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित 5 ठिकाणच्या मंजुरी प्रगती पथावर आहेत.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर मशीन, जंबो सिलेंडर, डय़ुरा सिलेंडर यांच्या माध्यमातून ऑक्सिजन उपलब्धतेसाठी आम्ही आमचा खासदार फंड तसेच इतर निधीचा वापर करण्याचा सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबतीत आपणास आमच्याकडून लागेल ती मदत व सहकार्य केले जाईल. तसेच नॅशनल ॲम्बुलन्स सर्व्हिस टोल फ्री नंबर 108 या वर रुग्णांनी कॉल केले असता त्यांच्याकडून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध असेल तरच आम्ही रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवू असे सांगितले जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले. यासंबंधी जिल्हाधिकारी यांना ही बाब निदर्शनास आणून असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासंबंधी लेखी आदेश आरोग्य प्रशासनास देण्यात यावेत, अशा सूचना केल्या.
गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन वापरण्यास अडचणी येत आहे. ही गंभीर बाब निदर्शनास आणून वीज पुरवठा खंडित होऊ नये. जिल्ह्यातील ज्या रुग्णांना होम आयसोलेशन होणे जागेअभावी शक्य होत नाही, त्यांच्यासाठी रयत शिक्षण संस्थेतील परिपूर्ण सुविधा असलेली महाविद्यालये ताब्यात घेऊन तेथे विलगिकरण कक्ष उभारण्यात यावेत अशा सूचना केल्या. यासर्व बाबींची पूर्तता होणे अतिशय महत्त्वाचे आहे. याच बरोबर जिल्हा प्रशासनास लागेल ती मदत करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.









