चीनमध्ये एका महिन्यात 33 हजार स्पोर्ट्स आर्ट्स क्लब सुरू, स्पोर्ट्ससाठी मिळत आहेत अधिक गुण
चीनमध्ये मुलांच्या डोक्यावरील होमवर्कचा (गृहपाठ) भार आणि शाळेबाहेरील टय़ूशन (शिकवणी) संपुष्टात आणल्यावर स्पोर्ट्स आणि आर्ट्स क्लब्सचा जणू पूरच आला आहे. जुलैच्या अखेरीस चिनी सरकारने शालेय मुलांसाठी नवे धोरण जारी केले होते. यात शाळांना असाइनमेंट कमी करण्याचे आदेश देण्यात आले होते, जेणेकरून मुलांना यात अधिक वेळ घालवावा लागू नये. या धोरणाच्या सुमारे महिन्याभरातच 33 हजार आर्ट्स आणि स्पोर्ट्स क्लब सुरू झाले आहेत.
मुलांची प्रकृती सुधारणे आणि श्रमशक्तीला नव्याने पुनर्रचित करण्यासाठी हा प्रयत्न आहे. शाळा आता विद्यार्थ्यांच्या कामगिरीत क्रीडा आणि अन्य कार्यांनाही महत्त्व देत आहेत. सरकारने सीनियर हायस्कुल प्रवेश परीक्षेत क्रीडाविषयक गुण वाढविण्याचे आश्वासन दिले आहे. हैनान प्रांताने मुलांना अतिरिक्त गुणांसाठी पोहणे, सॉकर, बास्केटबॉल आणि व्हॉलिबॉल यासारखे पर्याय दिले आहेत.

याचमुळे मुलांच्या आईवडिलांनी पर्यायी क्लासेसचा शोध सुरू केला आहे. बीजिंगमध्ये बॉक्सिंग क्लब चालविणारे जियानवे यांच्याकडे आता मुलांच्या कोर्सविषयी येणाऱया कॉल्सची संख्या अचानक वाढली आहे. जेनी लियू यांनी स्वतःच्या 7 वर्षीय मुलाला मागील महिन्यातच स्पोर्ट्स क्लबमध्ये सामील केले आहे. नव्या धोरणामुळे माझा मुलगा गुओगुओ याची गणिताची टय़ूशन बंद झाली. आता त्याच्याकडे वेळ असून तो खेळू शकतो. बॉक्सिंगमुळे तो मजबूत होईल असे लियू यांनी म्हटले आहे.
व्हिडिओ गेम्सवर अंकुश
सरकारने व्हिडिओ गेम्स खेळण्यावरील नियंत्रण वाढविले आहे. याचप्रकारे श्रीमंती आणि आलिशान जीवनशैलीच्या प्रदर्शनावरही नियंत्रण आणले आहे. चीनमधील तरुणाई स्थुलत्व, डोळय़ांचे आजार आणि नैराश्याने पीडित होत आहे. निम्म्याहून अधिक शालेय मुले दृष्टीदोषाने प्रभावित तआहेत. 6 ते 17 वयोगटातील पाचपैकी एक मुलगा स्थुलत्वाचा शिकार आहे.









