वृत्तसंस्था/ होबार्ट
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या होबार्ट खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झाने युक्रेनच्या किचनॉक समवेत महिला दुहेरीची अंतिम फेरी गाठली.
शुक्रवारी या स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य सामन्यात सानिया मिर्झा आणि नादिया किचनॉक या जोडीने स्लोव्हेनियाची झिदानसेक आणि झेकची बोझकोव्हा यांचा 7-6 (7-3), 6-2 असा पराभव केला. सानिया आणि नादिया या जोडीने दीड तासाच्या कालावधीत हा विजय मिळविला.
आता सानिया आणि किचनॉक यांचा दुहेरीचा सामना चीनच्या पेंग आणि झेंग यांच्याशी होणार आहे. सानियाने 2013 साली एकेरीच्या प्रकारातून निवृत्ती पत्कली होती. सानियाचे अलिकडच्या कालावधीत तब्बल दोन वर्षानंतर टेनिस क्षेत्रात पुनरागमन होत आहे. सानियाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत दुहेरीची सहा ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत.









