सीसीआयबीची कारवाई, तरुणाला अटक, एक जण फरारी : टिप्परसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
सीसीआयबीच्या पथकाने पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील होनग्याजवळ गुरुवारी मोठय़ा प्रमाणात गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक संजीव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून टिप्परसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार आदी वरि÷ अधिकाऱयांनी जप्त मुद्देमालाची पाहणी केली. या प्रकरणी सिद्धारुढ मडिवाळाप्पा पटात (वय 24, रा. संगोळ्ळी, ता. बैलहोंगल) याला अटक करण्यात आली आहे. त्याचा आणखी एक साथीदार शंकर बसवंत देसनूर (वय 38, रा. कणबर्गी) हा फरारी झाला आहे.
केए 25 सी 8711 क्रमांकाच्या कॅन्टरमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळताच सीसीआयबीचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. आर. मुत्नाळ, ए. के. कांबळे, बी. एन. बळगण्णावर, एस. सी. कोरे,
एस. एस. पाटील, सी. जे. चिन्नाप्पगोळ, एम. एम. वडेयर आदींचा समावेश असलेल्या पथकाने कॅन्टरमधील दारू जप्त केली.
होनगा येथील रसोई धाब्याजवळ कॅन्टर उभी करण्यात आली होती. त्यामध्ये 67 प्लास्टिकच्या पिशव्यांतून वेगवेगळय़ा कंपन्यांच्या व्हिस्की, रम, ब्रॅन्डीच्या 1920 बाटल्या भरुन ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी 1440 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त केली असून दोघा जणांवर काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक अबकारी कायदा 32 व 34 बरोबरच संसर्गजन्य रोगप्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कोरोना महामारी थोपविण्यासाठी संपूर्ण राज्यात सध्या लॉकडाऊन आहे. या काळात सकाळी 6 ते 10 पर्यंत दारू दुकाने उघडी असतात. मात्र या परिस्थितीचा फायदा घेत गोवा बनावटीची दारु विक्री जोरात सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर सीसीआयबीच्या अधिकाऱयांनी ही कारवाई केली आहे.









