वार्ताहर / काकती
प्रत्येकाने छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणूक घ्यावा, त्यांच्या मानवतेच्या धर्माचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन आमदार सतीश जारकीहोळी यांनी केले.
होनगा येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भूमिपूजनाचा कार्यक्रम रविवार दि. 25 रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी बाळकृष्ण आनंदाचे होते. स्वागत व प्रास्ताविक अरुण पाटील तर स्वागतगीत मराठा मंडळ हायस्कूलच्या मुलींनी केले. दीपप्रज्वलन व्यासपीठावरील मान्यवरांनी केले. गणेश प्रतिमा पूजन जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार, श्री काळभैरवनाथ प्रतिमा पूजन जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे, शिवछत्रपती प्रतिमा पूजन ता. पं. सदस्या चंद्रव्वा नाईक व ग्रा. पं. माजी अध्यक्षा जिजाबाई धुडूम, व्यासपीठावर एपीएमसी माजी अध्यक्ष आनंद पाटील व मान्यवरांनी केले. आमदार सतीश जारकीहोळी व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जारकीहोळी म्हणाले, आठरा पगडी जाती धर्मातील सर्वांना घेऊन शिवरायांनी सुराज्य निर्माण केले. तोच वसा घेऊन छ. शाहू महाराज, म. जोतिबा फुले यांनी बहुजन समाजासाठी आपले जीवन समर्पित केले. यांचा विसर न पडता कार्य करणे ही काळाची गरज आहे. छत्रपतींचा पुतळा उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. काकती कृषी पत्तीन संघाचे उपाध्यक्ष यल्लाप्पा आनंदाचे म्हणाले, श्री भैरवनाथ देवस्थान जिर्णोद्धाराचे काम चालू असल्याने छत्रपतींच्या पुतळा उभारणीस विलंब झाला. ग्रामस्थ व शिवप्रेमींच्या सहकार्यातून पुतळा उभारणीचा निर्धार केला आहे.
यावेळी ग्राम पंचायत माजी अध्यक्ष पुंडलिक पाटील, भैरु कांबळे, सिद्धाप्पा नाईक, अनिल आनंदाचे, कामाण्णा नाईक, जयवंतराव धुडूम, केदारी शिंदोळकर, जोतिबा भातकांडे, दीपक आनंदाचे, प्रकाश पावले, संदीप पाटीलसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यल्लाप्पा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर अरुण नाथबुवा यांनी आभार मानले..









