काकती/ वार्ताहर
होनगा येथे डुकरांच्या मुक्त संचाराने उच्छाद मांडला आहे. घाणीचे साम्राज्य, उभ्या पिकांची नासधूस यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. ग्राम पंचायत आणि वरि÷ अधिकाऱयांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
होनगा येथे डुकरांच्या मुक्त संचाराने स्वच्छतेची बाब गंभीर बनली आहे. येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेला सर्व्हिस रस्ता ते गावात गल्लोगल्ली गटारीतील सांडपाण्यात डुकरे वावरत असतात. स्वयंपाकाची भांडी, पाण्याची भांडी यामध्ये तोंड घालून घाण करत आहेत. ज्योतीनगर, बलभीम गल्ली, तानाजी गल्लीच्या पाठीमागील शिवारात भात व उसाचे पीक असून शिवारात डुकरांचा वावर वाढला आहे. उसाचे व भात पिकांचेही नुकसान करत आहेत.
या डुकरांच्या वावराने गावात गलिच्छ वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र दुर्गंधी पसरून आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे तर शिवारातील पिकांची होणारी नासधूस यामुळे ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत.
यापूर्वी अनेकवेळा ग्राम पंचायतीने या डुकरांच्या बंदोबस्तासाठी कठोर पावले उचलली पण तात्पुरते दोन-तीन महिने डुकराचे मालक डुकरांना घेऊन जातात. पुन्हा गावात मुक्त सोडून देतात. ग्राम पंचायतीने या डुकरांची कायमची समस्या सोडविण्यासाठी गांभीर्याने पावले उचलावीत. या डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी विचारविनिमय करून हद्दपार करावे. गावात पुन्हा डुकरे आणून सोडल्यास डुक्कर मालकांवर दंडात्मक कारवाईची मागणी होत आहे.









