कच्च्या माल उपलब्ध होण्यासाठी अडचणी, पेपरमधील आयात कामगार क्वारंटाईन
प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुक्मयातील होंडा व.पिसुर्ले औद्योगिक वसाहती मधील बंद असलेले कारभार आता सुरू झालेले आहेत. यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत असून जवळपास सर्वच आस्थापने सुरू झाल्याची माहिती संबंधित खात्याच्या सूत्राकडून उपलब्ध झालेली आहे. दरम्यान होंडा या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणार असलेल्या पेपरमिल याठिकाणी गुजरातमधून आणण्यात आलेल्या कामगारांना कोरोन्टाईन करण्यात आले असून यामुळे कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे सदर कंपनीच्या व्यवस्थापनाने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले आहे.
याबाबतची माहिती अशी की जागतिक स्तरावर कोरोना रोगाचा झपाटय़ाने बस फैलाव होताना दिसत आहे. यामुळे केंद्र व गोवा सरकारने लाँकडाऊन करण्यात आल्यानंतर राज्यातील अनेक आस्थापने बंद करण्यात आली होती. गेल्या काही दिवसापूर्वी सरकारने औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना सुरुवात करण्याचे निर्णय घेण्यात आल्यानंतर सत्तरी तालुक्मयातील होंडा व पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या जवळपास सर्वच आस्थापने सुरू झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी अवघीच आस्थापने सुरू होती. मात्र या आठ दिवसाच्या कालखंडात जवळपास सर्वच आस्थापने सुरू झाली असून यामुळे उत्पादनाला प्रारंभ झालेला आहे.
या आस्थापनात काम करणारे कर्मचारी कामावर रुजू झाल्यामुळे उत्पादनाला प्रारंभ झाला असला तरीही पूर्वीच्याच जोमाने सदर अआस्थापने सुरू करण्यासाठी अनेक स्तरावर अडचणी निर्माण होत असल्याचे वेगवेगळय़ा व्यवस्थापनाच्या सूत्रांनी स्पष्ट केलेली आहे. काही कंपनीतील उत्पादन सुरू करण्यासाठी आवश्यक स्वरूपाचा कच्चामाल प्राप्त होणे कठीण बनत आहे कारण अजूनही महाराष्ट्रातील मुंबई पुणे औरंगाबाद अशा सारख्या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सदर ठिकाणी कच्चामाल तयार करणाऱया कंपन्या बंद झालेले आहेत. यामुळे सत्तरी तालुक्मयातील औद्योगिक आस्थापनात कच्चामाल उपलब्ध करण्यासाठी अनेक स्तरावर समस्यांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे त्याचे बरेच प्रतिकूल परिणाम या भागातील आस्थापनांवर झाल्याचे समजते.
पेपर मिलमधील मजुरांना कोरोन्टाईन.
दरम्यान होंडा या ठिकाणी नव्याने बांधण्यात येत असलेल्या पेपरमिल या कंपनीच्या बांधकामासाठी गुजरात राज्यातून कामगारांना आणण्यात आल्यानंतर खळबळ निर्माण झाली होती. यासंदर्भाचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर व्यवस्थापनाने यासंदर्भात खुलासा करताना सदर राज्यातून नऊ कामगारांना आणण्यात आले होते. मात्र आवश्यक कागदपत्रे सोपस्कार पूर्ण केल्यानंतर त्यांना आरोग्य खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोरोन्टाईन करण्यात आलेले आहे. यामुळे कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नसून सदर कामगारांना कोरोना तपासणी झाल्यानंतरच कामावर रुजू करून घेण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले आहे.









