मडगाव ऍम्ब्युलन्स ट्रस्टचा उपक्रम
प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव शहरात 1988 साली मडगाव ऍम्ब्युलन्स ट्रस्टची स्थापना करण्यात आली. त्यावेळी ऍम्ब्युलन्स सेवा उलपब्ध होणे कठीण होते. ऍम्ब्युलन्स सेवा उपलब्ध झाल्याने कित्येक लोकांचे प्राण वाचविणे शक्य झाले. अनेक कुटूंबाना त्यामुळे दिलासा मिळाला. आत्ता ट्रस्ट तर्फे ‘हॉस्पिटल ऑन व्हिल्स’ हा नवीन उपक्रम हाती घेण्यात आला असून त्यासाठी निधी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मडगाव रवींद्र भवनात 20 डिसेंबर 2020 रोजी ‘हास्य सम्राट’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
मडगावात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती मडगावचे आमदार तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिली. यावेळी लायन्स क्लब इंटरनॅशनल, विभाग 9 चे उपाध्यक्ष विविध पावस्कर, मडगाव ऍम्ब्युलन्स ट्रस्टचे अध्यक्ष संतोष रायतूरकर, दामोदर बोरकर, किरण कुलकर्णी व हरेष राव उपस्थितीत होते.
उदय भेंब्रे जेव्हा मडगावचे आमदार होते, त्यावेळी ज्योती सरमळकर यांनी मडगाव शहरातील नागरिकांसाठी ऍम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यावेळी ऍम्ब्युलन्सची कमतरता होती. एखाद्या रूग्णाला गोमेकॉत नेणे कठीण व्हायचे. आजच्या सारखी परिस्थिती त्यावेळी नव्हती. आपण स्वता तसेच ज्योती सरमळकर, स्व. मधुकर मोर्डेकर, स्व. महाबळेश्वर बोरकर, संतोष रायतूरकर व इतरांनी पुढाकार घेऊन लोकांपर्यत जाऊन निधी उभारावा व ऍम्ब्युलन्स सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला. पण, त्यावेळी असा सूर निघाला की, ऍम्ब्युलन्सचा प्रस्ताव त्यावेळचे राज्यपाल गोपाळ सिंग यांच्याकडे न्यावा व त्याची मदत घ्यावी.
त्याप्रमाणे राज्यपालांना भेटून प्रस्ताव सादर केला. त्यांना हा प्रस्ताव आवडला व त्यांनी त्वरित ‘रेडक्रॉस’कडे संपर्क साधून ऍम्ब्युलन्स देणगीच्या स्वरूपात उलपब्ध करून दिली. या ऍम्ब्युलन्सला लोकांकडून ही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यासाठी अनेकांनी योगदान दिलेले आहे. त्यानंतर शववाहिका खरेदी करण्यात आली. त्यानंतर लायन्स क्लबने आत्ता पर्यंत तीन ऍम्ब्युलन्स लायन्स क्लबने उपलब्ध करून दिल्याची माहिती श्री. कामत यांनी यावेळी दिली. आत्ता हॉस्पिटल ऑन व्हिल्स हा उपक्रम हाती घेतला जात आहे. हा उपक्रम सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमांतून आरोग्य शिबीरे आयोजित करता येईल. त्याच ठिकाणी सर्व प्रकारची वैद्यकीय चाचणी करणे शक्य होईल असे श्री. कामत म्हणाले.
‘हॉस्पिटल ऑन व्हिल्स’ हा नवीन उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमाद्वारे लोकांनी त्यांच्या घरापर्यंत हॉस्पिटल सुविधा उलपब्ध करण्याचा मनोदय यावेळी विविध पावस्कर यांनी व्यक्त केला. ‘हॉस्पिटल ऑन व्हिल्स’ मध्ये डॉक्टर तसेच परिचारीका उलपब्ध असतील. तसेच हॉस्पिटलची मदत देखील घेतली जाणार आहे. या उपक्रमावर साधारपणे 50 लाख रूपये खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
हॉस्पिटल ऑन व्हिल्सच्या फंडार्थ ‘हास्य सम्राट’ ही स्पर्धा घेतली जाणार आहे. ही स्पर्धा 20 डिसेंबर रोजी मडगाव रवींद्र भवनच्या नाटय़गृहात घेतली जाणार असून त्यातील प्रथम तीन विजेत्यांना रोख रू. 10,000, रू. 5,000 व रू. 3,000 तसेच चषक प्रदान केले जाणार आहेत. ही स्पर्धा हिंदी, मराठी व कोकणी या तिन्ही भाषेतून असेल. या स्पर्धेच्या आयोजनांसाठी मडगाव रवींद्र भवनचे सहकार्य केले असल्याची माहिती यावेळी दिली जाणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी विविध पावस्कर (9822988918) किंवा दामोदर बोरकर (9422643978) यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.









