बीजिंग / वृत्तसंस्था
चीनची राजधानी बीजिंगमधील एका मोठ्या हॉस्पिटलला मंगळवारी आग लागली. या दुर्घटनेत 32 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. चेनफेंग गव्हर्नमेंट केअर सेंटर असे या हॉस्पिटलचे नाव आहे. एअर कंडिशनिंग युनिटमधील बिघाडामुळे ही आग लागल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी दीड वाजता आगीचा भडका उडाला. मदत व बचावकार्यादरम्यान फायर सेफ्टी डिपार्टमेंटने 71 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या दुर्घटनेप्रसंगी 100 हून अधिक रुग्ण इस्पितळात उपचार घेत होते. तसेच त्यांचे नातेवाईक व दैनंदिन रुग्णांची संख्याही मोठी होती. अग्निशमन दलाच्या जवळपास अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.









