पारंपरिक सुवर्णकार अडचणीत : निर्णयाचे स्वागत पण जाचक अटींमुळे अडथळे
सुशांत कुरंगी /बेळगाव
देशात सोने खरेदी- विक्री करण्यासाठी हॉलमार्क सक्तीचा करण्यात आला. सोन्यामध्ये शुद्धता राखता यावी, यासाठी सरकारने हे पाऊले उचलले आहे. हा निर्णय ग्राहकांच्या दृष्टीने जरी उपलब्ध ठरत असला तरी यामुळे लहान सुवर्णकार अडचणीत सापडले आहेत. जाचक अटी, वेळेचा अपव्यय यामुळे सुवर्णकारांचा या सक्तीला विरोध आहे. कापोरेट सुवर्णकारांच्या व्यवसायाला बळकटी देवून लहान सुवर्णकारांना देशोधडीला लावण्याचाच हा प्रकार असल्याची टीका सुवर्णकार करीत आहेत.
भारतीय बाजारपेठेत सोने- चांदीच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. सोन्याला प्रतिष्ठा असल्याने खरेदी मोठय़ा प्रमाणात होते. सोने खरेदीमध्ये पारदर्शकता आणून आंतरराष्ट्रीय बाजारात देशाला स्थान प्राप्त करून देण्यासाठी सरकारने सन 2000 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा आणला. परंतु या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 21 वर्षांचा कालावधी लागला. केंद्र सरकारने जुलै महिन्यापासून हॉलमार्कच्या दागिन्यांशिवाय दागिने विक्री करता येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. हॉलमार्क असल्याने ग्राहकांची फसवणूक होणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे.
हॉलमार्किंग म्हणजे काय?
ज्या प्रकारे प्रत्येक नागरीकाला स्वतंत्र आधारक्रमांक देण्यात आले, त्याप्रमाणे 2 ग्रॅमवरील प्रत्येक दागिन्याला एचयुआयडीनुसार स्वतंत्र क्रमांक देण्यात येणार आहे. दागिन्याच्या मागील बाजूस निरखून पाहिल्यास आपणाला लहान आकारात काही आकडे दिसतात. यात पहिला असतो ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) चा लोगो, त्यानंतर दागिन्यात सोन्याचं प्रमाण, त्या नंतर ज्या केंद्रात शुद्धता तपासण्यात आली त्याचा लोगो तर सगळय़ात शेवटी सोनाराचा लोगो असतो. हे सर्व जर दागिन्याच्या मागे कोरलेले असेल तर दागिना हॉलमार्कने प्रमाणित आहे असे मानले जाते. एका अर्थाने हॉलमार्क म्हणजे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्रच होय. त्यामुळेच हॉलमार्क असलेलेच सोने खरेदी- विक्री करता येईल केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
प्रत्येक दागिन्याला हॉलमार्क शक्मय आहे का?
दागिन्यांना हॉलमार्क देण्यासाठी अद्यापही केंद्रे उपलब्ध नाहीत. बेळगाव सारख्या मोठय़ा जिल्हय़ात केवळ 2 हॉलमार्क केंद्र आहेत. यातील एक शहापूर तर दुसरे समादेवी गल्ली बेळगाव येथे आहे. त्यामुळे जिल्हाभरातून दागिने या ठिकाणी हॉलमार्क देण्यासाठी येतात. मात्र सोने खरेदीचे प्रमाण आणि सुवर्णकारांची संख्या यांच्या तुलनेत केंद्रांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे केंद्रावर मर्यादा येतात परिणामी हॉलमार्कचा शिक्का देण्यासाठी दागिन्यांना 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागत आहे. लहान सुवर्णकार 1- 2 कामगार ठेवून व्यवसाय करतात. परंतु त्यांना आता एक अतीरीक्त व्यक्ती कामाला घेवून सॉफ्टवेअर, बिल, हॉलमार्क यांची व्यवस्था करावी लागणार आहे. तसेच इतर तालुक्मयांमधून सांभाळून दागिने आणून परत घेवून जाण्याचा धोका सुवर्णकारांवर असणार आहे. त्यामुळे जोवर हॉलमार्क केंद्राची संख्या वाढविली जाणार नाही, तोवर हॉलमार्क उपयुक्त ठरणार नाही असे सुवर्णकारांनी म्हणणे आहे.
हॉलमार्कची गरज काय?
सोने हा धातू नाजूक असल्याने आकार देताना तो तुटण्याची शक्यता असते. यासाठी त्यामध्ये थोडे तांबे मिसळले जाते. परंतु याचाच फायदा घेत काही सुवर्णकार तांब्याचा अधिक वापर करीत ग्राहकांची फसवणूक करतात. ही फसवणूक टाळून नागरीकांना शुद्ध स्वरूपातील सोन खरेदी करता यावे, यासाठी सरकारने हॉलमार्क सक्तीचा केला आहे.
टप्याटप्याने अंमलबजावणी करावी : वैभव वेर्णेकर (अध्यक्ष-दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशन)
हॉलमार्कमुळे सोन्याच्या शुद्धतेमध्ये पारदर्शकता येण्यास मदत होणार असल्याने सुवर्णकारांचा याला पूर्ण पाठिंबा आहे. परंतु या आदेशाच्या अंमलबजावणीमध्ये अनेक जाचक अटी व त्रुटी आहेत. सध्या देशभरात केवळ 265 हॉलमार्क केंद्र आहेत. त्यामुळे एका दागिन्याच्या हॉलमार्कसाठी 8 दिवसांचा कालावधी लागत असून लहान सुवर्णकारांना हे अधिकच अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या कायद्याची टप्याटप्याने अंमलबजावणी करावी, तसेच केंद्रांची संख्या वाढवावी असे वैभव वेर्णेकर यांनी सांगितले.
ही प्रक्रिया अत्यंत किचकट : वसंत पाटील (सुवर्णकार)
हॉलमार्क असलेले दागिने विक्री करण्यास सराफांची कोणतीच तक्रार नाही. परंतु ही प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. यामुळे लहान विपेते अडचणीत सापडले आहेत. बेळगावमध्ये एक-दोन कामगारांवर सुवर्णकार व्यवसाय करतात. परंतु या नव्या यंत्रणेमुळे नविन सॉफ्टवेअर, एक क्लार्क कामाला घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या सर्व जाचक अटींमुळे अनेकजण व्यवसाय बंद करून इतर उद्योग सुरू करण्याच्या मार्गावर असल्याचे शहापूरचे जे÷ सराफ वसंत पाटील यांनी सांगितले.
- 2 ग्रॅमवरील दागिन्यांना हॉलमार्कची सक्ती
- बेळगाव जिल्हय़ात केवळ 2 हॉलमार्क सेंटर
- चांदीच्याही दागिन्यांना आता हॉलमार्क
- आधीच कोरोनाने व्यवसाय थंड त्यात हॉलमार्कची सक्ती
- हॉलमार्कसाठी लागतोय 8 ते 10 दिवसांचा कालावधी
बेळगावमधील सुवर्णकारांची संख्या
- बेळगाव सराफ कट्टा – 450 ते 500
- शहापूर सराफ कट्टा – 250 ते 300
- कारवारी कारागीर – 200 ते 300
काय म्हणतात सुवर्णकार
- हॉलमार्कसाठी केंद्रांची संख्या वाढवा
- प्रत्येक तालुक्मयात हवे हॉलमार्क केंद्र
- टप्प्याटप्याने करावी अंमलबजावणी
- जाचक अटींपासून मिळावी मुक्ती









