प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट तसेच बार येत्या 1 जुलैपासून सुरु करण्याची मागणी गोवा हॉटेल्स, रेस्टॉरंट असोसिएशनने केली असून तसे लेखी निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केले. असोसिएशनच्या शिष्टमंडळाने त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयी चर्चा केली. तसेच राज्यातील पर्यटनही विनाविलंब चालू करावे, असेही सूचविले आहे. या प्रकरणी लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले.
असोसिएशनचे अध्यक्ष गौरीश धोंड आणि इतर पदाधिकाऱयांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती देऊन सांगितले की, गेल्या 3 महिन्यापासून गोव्यातील हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट बंद आहेत. आणखी जास्त काळ हे उद्योग बंद ठेवता येणार नाहीत. कोरोना किती दिवस राहील आणि कधी संपेल याची शास्वती नाही. तेव्हा हे उद्योग आता सुरू करणे गरजेचे आहे. गोव्यातील खाण उद्योग गेल्या आठ वर्षापासून बंदच आहे. आता गोवा पर्यटन उद्योगावरच अवलंबून असल्याने ते सुरू करण्याशिवाय पर्याय नाही. ते उद्योग बंद ठेवले तर गोवा आर्थिक दृष्टीने संपणार असा इशारा त्यांनी दिला आणि हे सर्व उद्योग तातडीने सुरू करावेत, अशी मागणी केली.
मद्याची दुकाने (लिकर शॉप) सुरू करण्यात आली मग, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट का नकोत ? असा सवाल असोसिएशनच्या पदाधिकाऱयांनी केला. सर्व नियमांचे पालन करून हे उद्योग सुरू करावेत, अशी विनवणी डॉ. सावंत यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती धोंड यांनी दिली.
गोवा हे पर्यटनावर अवलंबून असणारे राज्य आहे. त्यामुळे या सर्व उद्योगांसह पर्यटन सुरु करणे काळाची गरज बनली आहे. लॉकडाऊन बंद किती काळ पाळायचा यालाही काही मर्यादा आहे. ती मर्यादा आता संपली असून सरकारचा महसूलही मोठय़ा प्रमाणात बुडतो आहे, याकडेही शिष्टमंडळाने डॉ. सावंत यांचे लक्ष वेधले.
पत्रकार परिषदेत गिरीश सरदेसाई, प्रदीप धुरी, राजी साळगावकर, राजेश देसाई, प्रल्हाद सुखठणकर, अक्षय केणी हे असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.









