सीसीपीए’कडून मार्गदर्शक तत्वे जारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) सोमवारी सेवा शुल्काबाबत नवीन नियम केले. ‘सीसीपीए’ने हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना बिलामध्ये सेवा शुल्क आकारण्यास बंदी घातली आहे. म्हणजेच आता हॉटेल आणि रेस्टॉरंट ग्राहकांवर सर्व्हिस चार्ज भरण्यासाठी कोणताही दबाव टाकू शकत नाहीत. उलट तो एक ऐच्छिक पर्याय असेल, असे दिशानिर्देशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ग्राहक इच्छित असल्यास सेवा शुल्क भरू शकतो, परंतु ते ग्राहकाच्या विवेकबुद्धीनुसार असेल, असे नमूद करण्यात आले आहे.
हॉटेल आणि रेस्टॉरंटने ग्राहकांकडून सेवा शुल्क (सर्व्हिस चार्ज) आकारणे योग्य की अयोग्य? या प्रकरणावर अनेक आठवडे देशात चर्चा सुरू होती. सर्व्हिस चार्जवरून सुरू असलेल्या वादाला आता कलाटणी मिळाली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील ग्राहकांकडून अन्य कोणत्याही नावाने सेवा शुल्क वसूल केले जाऊ शकत नाही. हॉटेल्स ते फूड बिलमध्ये जोडू शकत नाहीत, असे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणने आपल्या आदेशात स्पष्ट केले. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सेवा शुल्क आकारण्यासंदर्भात अनुचित व्यापार पद्धती आणि ग्राहक हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी प्राधिकरणाने सेवा शुल्क मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नवीन नियमांनुसार इतर कोणत्याही नावाने सेवा शुल्क ग्राहकांकडून वसूल केले जाणार नाही.
‘सीसीपीए’कडे गेल्या काही दिवसात सर्व्हिस चार्जसंबंधी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींनुसार हॉटेल्सकडून मनमानी पद्धतीने 10 ते 20 टक्क्मयांपर्यंत सेवा शुल्क आकारले जात होते. यासंबंधी योग्य पडताळणी केल्यानंतर ‘सीसीपीए’ने ही अनुचित व्यापार पद्धती आणि ग्राहक हक्कांचे उल्लंघन असल्याचे लक्षात घेऊन ती रोखण्यासाठी पावले उचलली होती.
सेवा शुल्क आकारल्यास ग्राहकांना तक्रारीचा पर्याय
ग्राहकांना सेवाशुल्क द्यायचे नसल्यास ते संबंधित हॉटेलना विनंती करू शकतात. या विनंतीनंतरही व्यवस्थापनाने नकार दिल्यास ग्राहक राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन (एनसीएच) क्रमांक 1915 वर तक्रारदेखील करू शकतात. तसेच ग्राहक आयोगाकडे तक्रार करता येऊ शकते. जलद आणि प्रभावी निवारणासाठी www.e-daakhil.nic.in या पोर्टलद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेही तक्रार नोंदविली जाऊ शकते. तक्रारीचे स्टेटस तपासण्यासाठी आणि त्यानंतरच्या कारवाईसाठी ग्राहक संबंधित जिह्याच्या जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार करू शकतात.
सेवा शुल्क म्हणजे काय?
ग्राहक जेव्हा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये कोणतेही खाद्यपदार्थ घेतो. तेव्हा कोणत्याही प्रकारच्या सेवेसाठी सेवा शुल्क आकारले जाते. हे सहसा बिलाच्या तळाशी लिहिलेले असते आणि ते 5 टक्के ते 20 टक्केपर्यंत असते. परंतु नियमानुसार हॉटेल्स-रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्ज भरणे ऐच्छिक असले तरी ग्राहकांकडून त्याची उधळपट्टी केली जाते. आता यावर सीसीपीएकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. यानंतरही कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट ग्राहकांकडून सेवा शुल्क आकारत असल्यास राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांक 1915 वर कॉल करून तक्रार नोंदवता येऊ शकते.









