प्रतिनिधी / कोल्हापूर
तावडे हॉटेल येथील तनवाणी हॉटेलमध्ये सुरु असलेल्या बेटींग अडÎावर रविवारी रात्री छापा टाकून एकास अटक केली. उमेश नंदकुमार शिंदे (वय 39 रा. सांगली ता. मिरज जि. सांगली) याला अटक केली असून त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, हॅडसेट असा सुमारे 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईमध्ये कोल्हापूर पोलीसांनी सांगली येथील बेटींग रॅकेटचा पर्दाफाश केला असून याप्रकरणी सांगली येथील सनी उर्फ मिलिंद शेटे (वखार भाग) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली येथील काही तरुण कोल्हापूर जिह्यात येवून बेटींग रॅकेट चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास मिळाली होती. यानुसार रविवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तावडे हॉटेल येथील तनवाणी हॉटेल व लॉजिंगवर छापा टाकला. यावेळी रुम नंबर 207 मध्ये उमेश शिंदे हा आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील कलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध सनराईजर्स हैद्राबाद यांच्यातील सामन्यावर बेटींग घेत असल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता हे बेटींग सांगली येथील सनी उर्फ मिलींद शेटे (रा. वखार भाग) याच्यासाठी घेत असल्याचे समोर आले आहे. उमेश शिंदे याच्याकडून एक लॅपटॉप, चार मोबाई हँडसेट, दोन कॅल्क्युलेटर असा सुमारे 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान उमेश शिंदे व सनी मिलिंद शेटे या दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5 प्रमुणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, संतोष पवार, संजय पडवळ, कृष्णात पिंगळे, अनमोल पोवार, संतोष पाटील यांनी केली.
सांगली येथील रॅकेट
सांगली येथील मिलींद शेटे हा सांगली येथून हे बेटींग रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीसांनी त्याच्यावरही गुन्हा दाखल केला असून लवकरच त्याला ताब्यात घेण्यात येणार आहे. यानंतर या रॅकेटमधील अनेक नावे उघड होण्याची शक्यता अधिकाऱयांनी व्यक्त केली.









