अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार, 21 सप्टें. 2021, स. 11.15
● सोमवारी अहवालात 268 बाधित
● एकूण 9,570 जणांची तपासणी
● मृत्यू दराचा आलेख आटोक्यात
● कोरोनामुक्ती 2 लाख 36 हजार पार
● उपचारार्थ रुग्ण संख्या 6 हजारावर
सातारा / प्रतिनिधी :
जिल्हय़ात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सुरु असलेला कोरोनाचा कहर आटोक्यात येवू लागला आहे. तीन अंकी संख्येने वाढ सुरुच असली तरी ती 200, 300 च्या पटीत आहे. यामध्ये काही तालुक्यांमध्ये बाधित वाढ एक अंकी संख्येवर आली असून काही तालुक्यात दोन अंकी संख्येने वाढ सुरु असून यामध्ये पुन्हा सातारा व फलटण हे अल्पवाढीत देखील हॉटस्पॉटच आहे तर कराडसह इतर तालुक्यांना वाढ मंदावल्याचा दिलासा मिळत आहे. सप्टेंबरच्या मध्यावर संसर्ग आटोक्यात येताना दिसत असून आजमितीस उपचारार्थ रुग्ण संख्या 6 हजारावर आलेली आहे. हॉटस्पॉट तालुक्यामध्ये देखील संसर्ग आटोक्यात आहे.
सोमवारी अहवालात 268 बाधित
रविवारी रात्री आलेल्या अहवालात वाढीचा आलेख 200 च्या खाली घसरल्याचा दिलासा मिळाला होता. दर रविवारी तो नेहमीच घसरतो कारण तपासणी कमी झालेली असते. सोमवारी आलेल्या अहवालात आलेख थोडासा उंचावला असून 268 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये एकूण 9,576 जणांची तपासणी करण्यात आलेली आहे. या आकडेवारीनुसार पॉझिटिव्हिटी दर खाली घसरत चाललेला दिसून येत आहे
वाढ मंदावते, पण थांबत नाही
बाधित वाढीचा वेग गत काही महिन्यांपेक्षा चांगला मंदावलेला आहे. मात्र तो थांबत नाही. थांबण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना कराव्या लागतील याचा अभ्यास आता प्रशासनाला करावा लागेल. कारण गेले पाच महिन्यापासून सातारा जिल्हा या गर्तेत अडकलेला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत नाही म्हटलं तरी गर्दी झालेली होती पण तरीदेखील जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटीचा दर खाली राहिलेला आहे. जिल्ह्यातील सगळी जगरहाटी देखील सुरू झालेली आहे. अपवादात्मक नागरिक सोडल्यास सगळे नियम पाळत आहेत ग्रामीण भागात नियमांना तिलांजली दिली जात आहे कारण तिथे फार एवढी गर्दी नसते.
हॉटस्पॉट ठरलेले तालुके आटोक्यात
हॉटस्पॉट कराड तालुक्याला मोठा दिलासा मिळाला असून कराड तालुक्यात बाधित वाढीचा वेग अगदी नगण्य राहिलेला आहे. तर हॉटस्पॉट सातारा, फलटण व खटाव या तालुक्यांमध्ये अद्याप दोन अंकी संख्येने व 50 ते 60 च्या दरम्यान बाधित वाढ सुरू आहे. तर इतर तालुक्यातील नवीन बाधितांची संख्या नगण्य असून महाबळेश्वर तालुका कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. जिल्ह्यात गतीने सुरू असलेले लसीकरण आणि त्यामुळे कमी झालेला बाधित वाढीचा वेग सध्या तरी दिलासा देत आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमूने 19,98,311
एकूण बाधित 2,47,936
एकूण कोरोनामुक्त 2,36,559
मृत्यू 6,043
उपचारार्थ रुग्ण 6802
सोमवारी जिल्हय़ात
बाधित 169
मुक्त 465
मृत्यू 00









