कोल्हापूर / कृष्णात पुरेकर
कोरोना’च्या पॉझिटिव्ह रूग्णांची वाढती संख्या अन् आरटीपीसीआर लॅबकडून येणाऱया उशिरा रिपोर्टमुळे उपचारांवर मर्यादा येत आहेत. त्यातूनच कंटेन्मेंट झोन, कोरोना हॉटस्पॉटमध्ये कोरोना निदानासाठी रॅपीड अँटीजेन टेस्टला आयसीएमआरने मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील हॉटस्पॉट, कंटेन्मेंट झोनमध्ये लवकरच रॅपीड अँटीजेन टेस्टद्वारे कोरोना निदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 40 हजार कोव्हीड 19 डिटेक्शन कीट मिळणार आहेत. ती उपलब्ध होताच जिल्हा रूग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत रॅपीड अँटीजेन टेस्ट होणार आहेत.
देशातील कोरोना प्रतिबंधासाठी केंदीय आरोग्य, कुटुंबकल्याण मंत्रालयाने प्रारंभी प्रत्येक जिल्हय़ात आरटीपीसीआर लॅब उभारल्या. याद्वारे सीबीनॅट, ट्रूनॅट अंतर्गत स्वॅबद्वारे कोरोना निदान सुरू झाले. या टेस्टद्वारे निदान होण्यास उशीर होऊ लागला. सीबीनॅटवरील स्वॅब तपासणीला मर्यादा आल्या. तपासणीसाठीच्या कार्टेजची कमतरता होती. त्यामुळे कोरोना निदान लवकर होण्यासाठी संशोधन सुरू हेते.
इंडियन कौन्सील ऑफ मेडीकल रिसर्च (आयसीएमआर) आणि ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएमएस) यांनी तपासणीअंती ‘स्टॅडर्ड क्यु कोव्हीड 19 एजी डिटेक्शन’ कीटला मान्यता दिली. या कीटचा वापर करून केलेल्या ‘सार्स कोव्हीड 2 चे रॅपीट ऍटीजेन’ टेस्टद्वारे लवकर निदान होत असल्याचे स्पष्ट झाले. रॅपीड टेस्टद्वारे निगेटिव्ह निदानाचे प्रमाण 99 टक्के आहे. रूग्णाच्या शरीरातील व्हायरल विषाणूच्या प्रमाणावर पॉझिटिव्हचे निदान 50 ते 85 टक्क्यांपर्यत आहे. त्यामुळे तातडीच्या निदानासाठी या टेस्टचा वापर शक्य आहे.
एका डिटेक्शन कीटमध्ये 25 टेस्ट होणार
शासनाने रॅपीड अँटीजेन तपासणीसाठी एसडी बायोसेन्सर कंपनीच्या डिटेक्शन कीटला मान्यता दिली आहे. या एका किटमध्ये 25 चाचण्या होतात. अशा राज्यात 1 लाख टेस्ट होणार आहेत. प्रति कीट 450 रूपये आणि जीएसटी अशा 40 हजार कीट खरेदीसाठी मंजुरी मिळाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रूग्णालयांना 450 रूपयांत ही कीट मिळणार आहेत. यासाठी साडेचार कोटींचा निधी ‘आपत्ती निवारण’तून दिला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कीट घेतली जाणार आहेत.
कोरोना हॉटस्पॉट, कंटेन्मेंट झोनमध्ये होणार रॅपीड अँटीजेन टेस्ट
राज्यातील कोरोना हॉटस्पॉट, कंटेन्मेंट झोनमध्ये वैद्यकीय अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन कीटद्वारे ऍटीजेन टेस्ट होणार आहेत. फ्ल्यूसदृश्य लक्षणे असलेल्या, ‘कोरोना पॉझिटिव्ह’च्या संपर्कातील पण लक्षणे नसलेल्या, व्याधीग्रस्त यातही हृदयविकार, फुस्फुस, यकृत, मुत्रपिंड, मधुमेह, रक्तदाबाचा त्रास असलेल्या, अवयव प्रत्यारोपण, एचआयव्ही पॉझिटिव्ह, तसेच गर्भवतींवर तातडीने उपचारासाठी या टेस्टद्वारे निदान होणार आहेत. रूग्ण असलेल्या ठिकाणी जाग्यावरच डिटेक्शन कीटद्वारे स्वॅब घेतला जाणार आहे. अन् अर्ध्या तासात कोणत्याही बाहय़ उपकरणाशिवाय निदान होणार आहे. यात निगेटिव्ह रिपोर्ट आला तरच आरटीपीसीआरद्वारे स्वॅब तपासणी होणार आहे. शासनाकडून डिटेक्शन कीट मिळताच रॅपीड अँटीजेन टेस्टला सुरूवात होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.