वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या निवडणुकीवेळी क्रीडा आचारसंहितेचे उल्लंघन झाले असल्याने त्यांना पद सोडण्याची सूचना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने केली होती. त्यामुळे मुश्ताक अहमद राजीनामा देणार हे अपेक्षित होते. त्यांच्या जागी आता ग्यानेंद्रो निगोम्बम यांची निवड हॉकी इंडिया कार्यकारी मंडळाने केली आहे. ते याआधी फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष होते.
‘हॉकी इंडिया कार्यकारी मंडळाने शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आणि मणिपूरच्या ग्यानेंद्रो निगोम्बम यांची हॉकी इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली,’ असे एचआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. 7 जुलै रोजी अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्तव राजीनामापत्र दिल्यामुळे ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
2018 मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अहमद यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे क्रीडा मंत्रालयाला आढळून आल्याने या पदासाठी नव्याने निवडणूक घेण्याचे पत्र त्यांनी 6 जुलैला हॉकी इंडियाचे सरचिटणीस राजिंदर सिंग यांच्याकडे पाठविले होते. सप्टेंबर 2022 च्या उर्वरित कालावधीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत नवी निवड करण्याची सूचना त्यांनी त्यात केली होती. ‘या प्रकरणाची तपासणी करण्यात आली असून अहमद यांनी याआधी हॉकी इंडियाचे खजिनदार म्हणून 2010 ते 2014 आणि सरचिटणीस म्हणून 2014 ते 2018 या कालावधीत काम पाहिले आहे. त्यामुळे हॉकी इंडियाचे पदाधिकारी म्हणून ते सलग तिसऱयांदा निवडून आले होते. राष्ट्रीय क्रीडा फेडरेशनच्या आचारसंहितेत पदाधिकाऱयांचा कालावधी व वय यांचे जे दिशानिर्देश दिले आहेत, त्याचे उल्लंघन अहमद यांच्याकडून झाले असल्याने त्यांना या पदावरून मुक्त करावे, असेही त्यात म्हटले होते. एनएसएफच्या नियमानुसार चार वर्षाच्या कालावधीची दोन पदे सलग दोनदा भूषविण्याची मुभा आहे. या प्रकरणावरून एनएफएस व क्रीडा मंत्रालय यांच्यात बराच वाद निर्माण झाला होता.









