वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रीडा क्षेत्रातील कुशल प्रशासक तसेच आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष नरिंदर बात्रा यांच्या अध्यक्षपदाच्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय हॉक फेडरेशनच्या कार्यकारी समितीची ऑनलाईनवरील बैठक लांबणीवर टाकण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कार्यकारी समितीची बैठक कोरोना महामारीमुळे पुढीलवर्षीच्या मे महिन्यापर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची पुढील बैठक होईपर्यंत बात्रा यांच्या अध्यक्षपदाच्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. चालू वर्षांतील 28 ऑक्टोबरला नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची बैठक घेण्यात येणार होती पण या फेडरेशनच्या कार्यकारी समितीच्या ऑनलाईनवर झालेल्या बैठकीत नवी दिल्लीतील ऑक्टोबरमधील बैठक लांबणीवर टाकण्यात आली असून या बैठकीची नवी तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असे फेडरेशनच्या प्रवत्याने सांगितले. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या विद्यमान कार्यकारी समितीच्या सदस्यांना मुदत वाढ मिळाली आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षांच्या मुदत वाढीप्रमाणे आता इतर सदस्य डेनी आंद्रादे, हॅजेल केनेडी, एरिक कॉर्नेलीसन, तयाब इक्रम यांनाही वाढ मिळाली आहे. या फेडरेशनच्या अध्यक्ष आणि इतर सदस्यांची मुदत 2020 ऑक्टोबरमध्ये संपणार होती. आता त्यांना मे 2021 पर्यंत मुदत वाढ मिळाली आहे.








